पुणे: मार्च महिना अर्ध्यावर येण्यापूर्वीच सूर्याने आपले प्रखर रूप दाखवायला सुरुवात केली असून, महाराष्ट्रात जणू अग्नीवर्षाव सुरू झाला आहे. विदर्भातील अकोला आणि अमरावती जिल्ह्यांना उन्हाच्या तीव्र झळा बसत असून, येथे अधिकृतपणे 'उष्णतेची लाट' धडकली आहे. विशेष म्हणजे, रविवारी अकोल्यात देशातील सर्वाधिक 40.8 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली असून, संपूर्ण राज्य आता घामाघूम होऊ लागले आहे. भारतीय हवामान विभागाने आज विदर्भासह मध्य महाराष्ट्र आणि कोकणात 'येलो अलर्ट' जारी करत नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
हवामानातील या बदलांमागे छत्तीसगडपासून झारखंडपर्यंत सक्रिय असलेला हवेच्या कमी दाबाचा पट्टा कारणीभूत ठरत आहे. एकीकडे विदर्भ होरपळत असताना, दुसरीकडे मध्य प्रदेशातील रायगड येथे देशाच्या सपाट भूभागावरील नीचांकी 12.4 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.
महाराष्ट्राचा विचार करता, निफाड येथील गहू संशोधन केंद्रात राज्याचा नीचांकी पारा 12.0 अंश सेल्सिअसपर्यंत घसरलेला पाहायला मिळाला. तापमानातील ही टोकाची तफावत निसर्गाच्या लहरीपणाची साक्ष देत असून, उन्हाचा चटका आता असह्य होऊ लागला आहे.
विदर्भातील तापमानाचा पारा चाळीशी पार गेल्याने परिस्थिती चिंताजनक बनली आहे. अमरावतीत 40.6 अंश सेल्सिअस, तर वर्ध्यात 40 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली असून, सोलापूर आणि वाशीममध्येही पारा 39 अंश सेल्सिअसच्या उंबरठ्यावर पोहोचला आहे. जेव्हा एखाद्या ठिकाणचे तापमान 40 अंश सेल्सिअसच्या पुढे जाते आणि सरासरीपेक्षा 4.5 अंश सेल्सिअसने अधिक वाढते, तेव्हा तिथे 'उष्णतेची लाट' आल्याचे जाहीर केले जाते. अकोला आणि अमरावतीने हा निकष पार केल्याने विदर्भातील जनजीवन विस्कळीत होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
पश्चिम महाराष्ट्र आणि खान्देशातही सूर्याची आग ओकणे सुरूच आहे. जळगावमध्ये 38.5 अंश सेल्सिअस, तर जेऊर आणि मालेगाव येथे 38.0 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. विद्येचे माहेरघर असलेल्या पुण्यात कमाल तापमान 36.6 अंश सेल्सिअस तर किमान 16.8 अंश सेल्सिअस नोंदवले गेले. तसेच सांगलीत 38.3 अंश सेल्सिअस आणि सातऱ्यात किमान 18.0 अंश सेल्सिअस तापमानाच्या नोंदीने उकाडा वाढवला आहे. नाशिकमध्ये पारा 37.1 अंश सेल्सिअसवर स्थिरावला असून, धुळ्यात तो 36.5 अंश सेल्सिअस इतका नोंदवला गेला आहे. थंडाव्यासाठी प्रसिद्ध असलेल्या महाबळेश्वरमध्येही 30.7 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाल्याने पर्यटकांना उन्हाचे चटके सोसावे लागत आहेत.
कोकण किनारपट्टीवर उष्णतेसोबतच दमट हवामानाचे (Humid Heat) संकट उभे राहिले आहे. मुंबईतील सांताक्रूझ येथे 33.0 अंश सेल्सिअस आणि डहाणूमध्ये 33.8 अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले असून, आर्द्रतेमुळे उकाड्याचे प्रमाण प्रचंड वाढले आहे.
हवामान विभागाने पालघर, ठाणे, मुंबई, नंदूरबार, धुळे, जळगाव, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, जालना आणि परभणी या जिल्ह्यांसाठी 'उष्ण व दमट' हवामानाचा इशारा दिला आहे. दरम्यान, उन्हाच्या या तीव्र तडाख्यासोबतच निसर्गाचा आणखी एक विरोधाभास पाहायला मिळणार असून, सिंधुदुर्ग, कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यांत काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.