Maharashtra Weather Update: महाराष्ट्र तापला; विदर्भ होरपळला, राज्यावर ‘उष्णतेच्या लाटेचे’ सावट

महाराष्ट्रात उन्हाचा कडाका वाढला असून अकोल्यात 40.9 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.

Maharashtra Weather Update: महाराष्ट्र तापला; विदर्भ होरपळला, राज्यावर ‘उष्णतेच्या लाटेचे’ सावट

पुणे: मार्च महिना अद्याप अर्धाही सरला नसताना राज्याच्या हवामानात मोठी उलथापालथ पाहायला मिळत आहे. सूर्याने 'रुद्रावतार' धारण केला असून, विदर्भातील अकोला येथे देशातील सर्वाधिक 40.9 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. तापमानाचा पारा चाळीशी ओलांडून पुढे गेल्याने जनजीवन होरपळून निघाले आहे. केवळ विदर्भच नव्हे, तर कोकण आणि मध्य महाराष्ट्रातही उन्हाच्या तीव्र झळा आणि घामाच्या धारांनी नागरिक हैराण झाले आहेत. भारतीय हवामान विभागाने आज विदर्भ आणि कोकणात उष्णतेच्या लाटेचा, तर मराठवाड्यात उष्ण व दमट हवामानाचा 'येलो अलर्ट' जारी केला आहे.

अकोला 'हॉटस्पॉट', सोलापूरही तापले

हवामानशास्त्राच्या निकषानुसार, जेव्हा कमाल तापमान 40 अंश सेल्सिअसच्या पुढे जाते आणि सरासरीपेक्षा 4.5 अंश सेल्सिअसने अधिक वाढते, तेव्हा 'उष्णतेची लाट' (Heatwave) मानली जाते. सोमवारी अकोल्याने हा निकष ओलांडत 40.9 अंश सेल्सिअसचा टप्पा गाठला. त्यापाठोपाठ सोलापूरचा पाराही 40.2 अंश सेल्सिअसवर स्थिरावला आहे. वाशीम (39.6 अंश सेल्सिअस), वर्धा (39.2 अंश सेल्सिअस) आणि ब्रह्मपुरी (39.0 अंश सेल्सिअस) या शहरांमध्येही उन्हाचा चटका असह्य झाला आहे. बिहारपासून मराठवाड्यापर्यंत पसरलेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे हवेतील आर्द्रता वाढली असून, त्यामुळे उन्हाच्या झळांसोबतच 'उकाडा' अधिक जाणवत आहे.

कोकण आणि विदर्भात 'येलो अलर्ट'चा कडाका

आज कोकणातील मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यांत उष्णतेच्या लाटेची शक्यता वर्तवण्यात आली आहे. समुद्रकिनाऱ्यावरील भागात आर्द्रतेचे प्रमाण अधिक असल्याने 'उष्ण व दमट' हवामानाचा इशारा रत्नागिरी आणि सिंधुदुर्गसाठी देण्यात आला आहे. विदर्भात अकोल्यासह अमरावती आणि वर्धा येथेही सूर्याची आग कायम राहणार असून नागरिकांनी दुपारच्या वेळी घराबाहेर पडताना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना आणि बीड या जिल्ह्यांमध्येही घामाच्या धारांनी नागरिक चिंब होणार आहेत.

हेही वाचा: Mumbai Hotel Closed News : मोठी बातमी! आखाती युद्धाचा मोठा परिणाम; मुंबईतील हॉटेल्स बंद होण्याच्या मार्गावर, घरातही अन्न शिजवणं होणार कठीण

हवामानाचा विरोधाभास

एकीकडे राज्याचा मोठा हिस्सा उन्हाने होरपळत असताना, उत्तर महाराष्ट्रात मात्र निसर्गाचा वेगळाच खेळ पाहायला मिळत आहे. नाशिक जिल्ह्यातील निफाड येथील गहू संशोधन केंद्रात राज्याच्या नीचांकी 11.4 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. मध्य प्रदेशातील रायगड येथे देशातील सपाट भूभागावरील सर्वात कमी 13.4 अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले. एकाच राज्यात कुठे 40 अंश सेल्सिअसची आग, तर कुठे 11 अंश सेल्सिअसचा गारवा, असा टोकाचा विरोधाभास सध्या पाहायला मिळत आहे.

प्रमुख शहरांमधील तापमान (अंश सेल्सिअसमध्ये)

पुण्यात कमाल तापमान 37.1 अंश सेल्सिअस असून किमान 15.4 अंश सेल्सिअसवर आहे. छत्रपती संभाजीनगर (38.0 अंश सेल्सिअस), परभणी (38.4 अंश सेल्सिअस), धुळे (38.0 अंश सेल्सिअस) आणि जळगावमध्ये (38.5 अंश सेल्सिअस) उन्हाचा चटका वाढला आहे. मुंबईत (सांताक्रूझ) 35.8 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली असली तरी दमट हवामानामुळे प्रत्यक्ष जाणवणारी उष्णता अधिक आहे. उर्वरित महाराष्ट्रातही पावसाची शक्यता नसल्याने उन्हाचा चटका आणि उकाडा कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

सावधान! आरोग्याची काळजी घ्या

वाढत्या तापमानामुळे उष्माघाताचा (Heatstroke) धोका वाढला आहे. हवामान खात्याने सतर्कतेचा इशारा दिल्याने नागरिकांनी भरपूर पाणी प्यावे, सुती कपडे वापरावेत आणि शक्य असल्यास दुपारी 12 ते चार या वेळेत थेट उन्हात जाणे टाळावे. निसर्गाचे हे बदललेले चक्र आणि वाढता पारा येणाऱ्या कडक उन्हाळ्याची नांदी मानली जात आहे.

हेही वाचा: Dombivli News: कल्याण डोंबिवली परिसरात पालिकेची मोठी कारवाई; 'शोरमा गर्ल' एकता सावंतची गाडी उचलली

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number