महाराष्ट्रात सध्या हवामानाचा दुहेरी तडाखा पाहायला मिळत आहे. एका बाजूला मराठवाडा आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये तापमानाने अक्षरशः कहर केला असून दुसऱ्या बाजूला काही भागांमध्ये वादळी पावसाचा इशाराही देण्यात आला आहे. हवामान विभागाने राज्यातील विविध भागांसाठी यलो अलर्ट जारी केला असून पुढील काही दिवस नागरिकांना उष्णतेसोबतच बदलत्या हवामानालाही सामोरे जावे लागणार आहे.
राज्यातील अनेक शहरांमध्ये तापमान 40 अंशांच्या पुढे गेले असून काही भागांमध्ये ते 45 अंशांपर्यंत पोहोचण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. विदर्भ आणि मराठवाड्यातील नागरिकांना प्रखर उन्हाचा सर्वाधिक फटका बसत आहे. अकोला, अमरावती, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, यवतमाळ आणि परभणी या भागांमध्ये उष्णतेची तीव्र लाट कायम राहण्याचा अंदाज आहे. दुपारच्या वेळेत रस्त्यांवर शुकशुकाट दिसत असून नागरिक घराबाहेर पडणे टाळताना दिसत आहेत.
हवामान विभागाच्या माहितीनुसार, रविवारी अनेक शहरांमध्ये तापमानाचा उच्चांक नोंदवण्यात आला. अमरावती, अकोला आणि वर्धा येथे पारा 45 अंशांच्या पुढे गेला. तर सोलापूर, नागपूर, जळगाव, वाशीम आणि चंद्रपूरमध्येही तापमान 43 अंशांहून अधिक नोंदवले गेले. राज्यातील सर्वात कमी तापमान महाबळेश्वर येथे 20.9 अंश सेल्सिअस इतके नोंदवण्यात आले.
उष्णतेसोबतच काही भागांमध्ये हवामान अचानक बदलण्याची शक्यता आहे. मराठवाड्यातील धाराशिव आणि लातूर जिल्ह्यांसाठी वादळी पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. या भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह जोरदार वारे आणि मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो. हवामान खात्याने शेतकरी आणि नागरिकांना सतर्क राहण्याचा सल्ला दिला आहे. विजांचा कडकडाट होत असताना झाडाखाली किंवा मोकळ्या जागेत उभे राहू नये, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
दरम्यान, मान्सूनच्या प्रतीक्षेत असलेल्या महाराष्ट्रासाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. नैऋत्य मोसमी वारे 16 मे रोजी अंदमान-निकोबार बेटांमध्ये दाखल झाले असून पुढील काही दिवसांत त्यांची गती वाढण्याची शक्यता आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, 5 ते 6 जूनदरम्यान मान्सून महाराष्ट्रात दाखल होऊ शकतो. त्यामुळे उष्णतेने हैराण झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
सध्या राज्यातील वातावरणात मोठे बदल होत असल्याने नागरिकांनी काळजी घेणे आवश्यक आहे. दुपारच्या वेळेत शक्यतो घराबाहेर पडणे टाळावे, पुरेसे पाणी प्यावे आणि उष्माघातापासून बचावासाठी खबरदारी घ्यावी, असे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.