मे महिन्याच्या पूर्वार्धात भारतीय हवामान खात्याने उर्वरित मे महिन्याच्या हवामानाचा अंदाज वर्तावला आहे. राज्यात मे महिन्याच्या उत्तरार्धात पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तावली आहे. सध्या राज्यात तापमाचा पारा 40 ते 45 अंश सेल्सिअसच्या आसपास आहे. ज्यामुळे महाराष्ट्रात उष्णतेची लाट होरपळून काढत आहे. दरम्यान येत्या काही दिवसात कोकण आणि मध्य महाराष्ट्रात उष्णता अधिक असेल. तर मराठवाड्यात आणि विदर्भात विजांच्या गडगडाटासह वादळी पाऊस परतणार आहे. आज चंद्रपूर, गडचिरोलीसह यवतमाळ आणि वर्धा या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला असून पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
मुंबईसह कोकणात आणि ठाणे, पालघर, नवी मुंबईमध्ये पावसाचा कोणताच इशारा नसून कमाल तापमान 32-35 अंशांच्या दरम्यान आहे ज्यामुळे आकाश निरभ्र राहील. तसेच उत्तर महाराष्ट्रात धुळे शहरासह जिल्ह्याचे तापमान 40 अंश सेल्सिअसच्या पुढे गेल्याने जणजीवनासह जनावरांवर देखील परिणाम होत आहे. उत्तर महाराष्ट्र नाशिकच्या ग्रामीण भागात सध्या ऊन वाढत असून त्याचा फटका पशुपक्षी व जनावरांना सुद्धा बसू लागला आहे. त्यातच नाशिकच्या ग्रामीण भागात जनावरांच्या गोठ्यात पाण्याचा फवारा मारत गोठा थंड करण्यात येत असून त्यामुळे जनावरांना कुठेतरी गारवा निर्माण होतोय असे चित्र सध्या नाशिकच्या ग्रामीण भागात पाहायला मिळत आहे. जळगाव, नंदुरबार आणि अहिल्यानगर येथे हवामान कोरडे आणि उष्ण राहील.
मध्य महाराष्ट्रात आणि पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूर आणि सोलापूर येथे तापमान 35-40 अंशांवर आहे. ज्यामुळे हवामान कोरडे जाणवत आहे. मराठवाड्यातसह विदर्भात उन्हाचा पारा वाढलेला असताना देखील वादळी पावसाचं संकट घोंघावत आहे. आज कमाल तापमान 38-42 अंशांच्या दरम्यान राहील. एकीकडे उष्णतेच्या लाटा तर दुसरीकडे वादळ आणि विजेसह अवकाळी संकट सक्रीय झालं असताना नागरिकांना योग्य ती काळजी घ्यावा लागणार आहे.