मुंबई: डिसेंबरचा शेवटचा आठवडा उजाडला तरी महाराष्ट्रातील थंडीचा कडाका कमी होण्याचे नाव घेत नाहीये. दिवसा कडक ऊन आणि रात्री हुडहुडी भरवणारा गारठा, अशा दुहेरी हवामानाचा अनुभव सध्या राज्यातील जनता घेत आहे. मुंबईसह उपनगरातही पहाटेच्या वेळी गार वारे वाहत असून, हा थंडीचा कडाका नवीन वर्षाच्या सुरुवातीला म्हणजेच जानेवारी महिन्यातही असाच कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
राज्यातील थंडीचे हॉटस्पॉट मानल्या जाणाऱ्या धुळे, परभणी आणि निफाड या तीन जिल्ह्यांमध्ये तापमानाचा पारा कमालीचा घसरला आहे. या जिल्ह्यांमध्ये यंदाचा 'विकेंड' चांगलाच गारठलेला असणार आहे. महाराष्ट्रातील या थंडीला उत्तर भारताकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांचे पाठबळ मिळत असून, उत्तर प्रदेश, पंजाब आणि हरियाणा या राज्यांमध्ये 1 जानेवारी 2026 पर्यंत 'रेड अलर्ट' जारी करण्यात आला आहे. तिथे पडणाऱ्या दाट धुक्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून, त्याचे थेट पडसाद आता महाराष्ट्राच्या वातावरणावर उमटताना दिसत आहेत.
हवामान तज्ज्ञांच्या मते, उत्तर राजस्थान आणि झारखंडमध्ये सध्या 'कोल्ड वेव्ह' (Cold Wave) म्हणजेच थंडीच्या लाट निर्माण झाली आहे. तसेच, 30 डिसेंबरपासून हिमालयीन पट्ट्यात पुन्हा एकदा जोरदार बर्फवृष्टी होण्याची शक्यता आहे.
या 'वेस्टर्न डिस्टर्बन्स'मुळे उत्तरेकडील थंड वारे अधिक वेगाने दक्षिणेकडे सरकतील, ज्यामुळे विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात येत्या तीन दिवसात पारा अधिक खाली येण्याची अधिक शक्यता आहे. किमान तापमानात दोन ते तीन अंशांची चढ-उतार पाहायला मिळणार असली, तरी पहाटेचा गारठा मात्र हाडांना टोचणारा असेल.
उत्तर भारतातील या रौद्र हवामानाचा मोठा फटका वाहतूक व्यवस्थेला बसला आहे. दाट धुक्यामुळे दिल्ली, अमृतसर येथील विमान सेवा आणि रेल्वे गाड्यांच्या वेळापत्रकात मोठे बदल झाले आहेत. याचा थेट परिणाम मुंबई आणि पुण्यातून उत्तर भारताकडे जाणाऱ्या पर्यटकांवर होत आहे. जर तुम्ही नवीन वर्षाच्या स्वागतासाठी उत्तर भारतात जाण्याचा प्लॅन केला असेल, तर धुक्यामुळे होणारा प्रवास विलंब आणि विस्कळीत झालेली वाहतूक लक्षात घेऊनच घराबाहेर पडणे सोयीचे ठरेल.
धुक्यामुळे महामार्गावरील दृश्यमानता कमी झाल्याने रस्ते अपघातांचा धोका वाढला आहे. त्यामुळे वाहनचालकांनी फॉग लाईट्सचा वापर करावा आणि वेग मर्यादित ठेवावा, असा सल्ला दिला जात आहे. तसेच, कडाक्याच्या थंडीमुळे श्वसनाचे आजार असलेल्या व्यक्तींनी आणि ज्येष्ठांनी पहाटेच्या वेळी विशेष काळजी घ्यावी. नवीन वर्षाच्या स्वागताला थंडीचा हा कडाका उत्साहात भर घालणारा असला, तरी आरोग्याच्या दृष्टीने सतर्क राहणे तितकेच महत्त्वाचे आहे.
हेही वाचा: Gold Silver Rate Today: आज सोनं किती महाग? चांदीचे ताजे दर काय आहेत?