नागपूर: उत्तर भारतामध्ये सध्या कडाक्याच्या थंडीने आणि दाट धुक्याने हुडहुडी भरली असून, याचे थेट पडसाद आता महाराष्ट्रात उमटू लागले आहेत. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या ताज्या इशाऱ्यानुसार, उत्तर भारताकडून येणाऱ्या बोचऱ्या थंड वाऱ्यांमुळे महाराष्ट्राच्या किमान तापमानात येत्या दोन ते तीन दिवसांत दोन ते चार अंश सेल्सिअसची मोठी घसरण होण्याची शक्यता आहे.
विशेषतः 26 आणि 27 डिसेंबर रोजी विदर्भ, उत्तर महाराष्ट्र आणि मध्य महाराष्ट्रात शीतलहरीचा ('कोल्ड वेव्ह') प्रभाव अधिक तीव्र असेल, ज्यामुळे नाताळच्या सुट्ट्यांमध्ये थंडीचा कडाका वाढणार आहे.
राज्याच्या हवामानावर सध्या दोन प्रमुख प्रणालींचा परिणाम दिसून येत आहे. एकीकडे दक्षिण-पूर्व अरबी समुद्र आणि केरळ किनारपट्टीवर 'सायक्लोनिक सर्क्युलेशन' (Cyclonic Circulation) सक्रिय झाले आहे, तर दुसरीकडे 27 डिसेंबर रोजी हिमालयाच्या पर्वतरांगांमध्ये एक नवा 'पश्चिमी विक्षोभ' (Western Disturbance) धडकणार आहे. या भौगोलिक बदलांमुळे उत्तरेकडून येणारे कोरडे आणि अतिथंड वारे वेगाने मध्य भारताकडे सरकत आहेत. परिणामी, मुंबई, पुणे आणि नाशिक यांसारख्या शहरांच्या किमान तापमानात मोठी घसरण होऊन थंडी वाढणार आहे.
हेही वाचा: Pune BJP: पुणे भाजपमध्ये उमेदवारीचा तिढा: फडणवीसांच्या दरबारात होणार अंतिम फैसला
विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रासाठी पुढील 48 तास अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहेत. या भागात थंडीचा प्रभाव इतका असेल की, रात्रीच्या तापमानासोबतच दिवसाच्या तापमानातही लक्षणीय घट होईल, ज्यामुळे 'हाडं गोठवणारी थंडी' अनुभवायला मिळू शकते. उत्तर महाराष्ट्रात पहाटेच्या वेळी मध्यम ते दाट स्वरूपाच्या धुक्याची दाट शक्यता आहे. यामुळे रस्ते वाहतुकीवर परिणाम होऊ शकतो, विशेषतः महामार्गावर प्रवास करणाऱ्या वाहनचालकांनी सतर्क राहणे गरजेचे आहे.
हवामान खात्याच्या अंदाजानुसार, महाराष्ट्रात पाऊस जरी नसला, तरी ढगाळ हवामान आणि बोचरी थंडी असे मिश्र वातावरण पाहायला मिळेल. पर्यटनासाठी किंवा विकेंड साजरा करण्यासाठी बाहेर पडणाऱ्या नागरिकांनी उबदार कपड्यांची व्यवस्था करून ठेवावी. शीतलहरीच्या काळामध्ये लहान मुले आणि ज्येष्ठांच्या आरोग्याची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे, कारण तापमानातील या अचानक बदलामुळे श्वसनाचे विकार बळावण्याची शक्यता असते.