मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज रात्री ८ .३० वाजता राज्यातील जनतेसोबत संवाद साधणार असून यावेळी टाळेबंदीची अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी टाळेबंदी वाढवणार असून निर्बंध थोड्या प्रमाणात शिथील केली जातील असं सांगितलं होतं. तसेच मुख्यमंत्री यासंबंधी अधिकृत माहिती देतील असंही त्यांनी स्पष्ट केलं होतं.
टाळेबंदी वाढली तरी ती किती दिवसांसाठी वाढणार आहे याबाबत अद्याप स्पष्टता नाही. तसंच नेमके कोणते निर्बंध शिथील केले जाणार आहेत याबद्दल अजून काही स्पष्ट करण्यात आलेलं नाही. राज्यात ५ एप्रिलपासून जीवनावश्यक वस्तू वगळता अन्य दुकानं बंद आहेत. व्यापाऱ्यांनी १ जूनपासून दुकाने उघडण्याचा इशारा दिला आहे. मात्र, सरकार कोणताही धोका पत्करण्यास तयार नाही.
लोकल फक्त अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी सुरु आहेत. त्यामुळे लोकलमध्ये आणखी कोणाला परवानगी दिली जाते का? याबाबत ही मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाकडे लक्ष लागून आहे.
राज्यात लसीकरण करताना अनेक अडचणी येत आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री आज काही नवीन घोषणा करणार का याकडे देखील लक्ष असणार आहे.
१८ वर्षावरील व्यक्तींचे लसीकरण अजूनही गतीने होत नाहीये. लसीकरणाला आणखी वेग आणण्याची गरज आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर सरकारने काय तयारी केली आहे. याबाबत देखील मुख्यमंत्री आज माहिती देण्याची शक्यता आहे.