Maharashtra Cabinet Decisions: मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत जनतेच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरणारे अनेक मोठे निर्णय घेण्यात आले. कोकण रेल्वेचे शिल्पकार म्हणून ओळखले जाणारे ज्येष्ठ नेते स्वर्गीय मधु दंडवते यांच्या नावाने सावंतवाडी रेल्वे स्थानकाचे नामकरण करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय यावेळी घेण्यात आला. तसेच शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्या, डोंबिवलीतील देवस्थानासाठी जमीन आणि नागपूरमधील रस्ते प्रकल्पांसाठी शुल्कमाफी यांसारख्या प्रस्तावांनाही मंजुरी देण्यात आली.
मंत्रिमंडळाने सावंतवाडी रेल्वे स्थानकाचे नाव ‘लोकमान्य मधु दंडवते रेल्वे टर्मिनस’ असे करण्यास हिरवा कंदील दिला आहे. कोकणातील नागरिकांकडून ही मागणी अनेक वर्षांपासून होत होती. आता हा प्रस्ताव अंतिम मान्यतेसाठी केंद्र सरकारकडे पाठवण्यात येणार आहे. मधु दंडवते यांनी कोकण रेल्वे प्रकल्पासाठी दिलेल्या योगदानाचा गौरव म्हणून हा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे.
याशिवाय, 2026 मधील शासकीय कर्मचाऱ्यांच्या सर्वसाधारण बदल्यांना मुदतवाढ देण्याचाही निर्णय घेण्यात आला. त्यासाठी महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे नियमन आणि शासकीय कामकाजातील विलंब टाळण्यासंदर्भातील 2005 च्या कायद्यात सुधारणा करण्यास मान्यता देण्यात आली आहे. या निर्णयामुळे प्रशासनातील बदल्यांची प्रक्रिया अधिक सुलभ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
डोंबिवली औद्योगिक क्षेत्रातील सागाव सोनारपाडा येथे असलेल्या पिंपळेश्वर देवस्थान मंदिर ट्रस्टलाही मोठा दिलासा मिळाला आहे. मंदिर ट्रस्टला 4 एकर 25 गुंठे जमीन नाममात्र दरात देण्यास मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. या जमिनीवरील ट्रस्टचा वापर नियमित करण्याचाही निर्णय घेण्यात आला. त्यामुळे स्थानिक भक्तांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
दरम्यान, नागपूरमधील नवीन नागपूर आणि बाह्य वळण रस्ता प्रकल्पासाठी खरेदी करण्यात येणाऱ्या जमिनीवरील मुद्रांक शुल्क आणि नोंदणी शुल्क माफ करण्याचा निर्णयही बैठकीत घेण्यात आला. हिंगणा तालुक्यातील गोदणी आणि लाडगाव परिसरातील जमीन थेट खरेदी प्रक्रियेत घेण्यात येणार असून, या निर्णयामुळे प्रकल्पाच्या कामाला वेग मिळण्याची अपेक्षा आहे. राज्य सरकारच्या या निर्णयांमुळे कोकण, ठाणे आणि विदर्भातील विविध विकासकामांना चालना मिळणार असल्याचे मानले जात आहे.