ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्याप्रकरणात अटक केलेल्या अमोल काळे याच्यासह अमित बिड्डे आणि गणेश मिस्कीन या तिघांचा ताबा शनिवारी मुंबई एटीएसने कर्नाटकच्या विशेष पथकाकडून घेतला.
या तिघांची न्यायालयाने १२ ऑक्टोरबरपर्यंत एटीएसच्या कोठडीत रवानगी केली आहे. लंकेश यांच्या हत्येप्रकरणी अटकेत असलेला आरोपी अमोल काळे हा पुण्यात होणाऱ्या सनबर्न फेस्टिवलमध्ये घातपात घडविण्यासाठी रचल्या गेलेल्या कटाचा प्रमुख होता, अशीही माहिती पुढे आली आहे.
महाराष्ट्र एटीएसच्या अधिकाऱ्यांनी नालासोपारा आणि राज्यात ठिकठिकाणी छापे टाकून स्फोटके आणि शस्त्रांचा मोठा साठा जप्त केला. याप्रकरणी वैभव राऊत, सुधन्वा गोंधळेकर, श्रीकांत पांगारकरसह नऊ जणांना अटक केली. त्यांच्या चौकशीमध्ये हा स्फोटकांचा साठा पुणे येथे होणाऱ्या सनबर्न फेस्टिवलमध्ये घातपात करण्यासाठी वापरण्यात येणार होता, अशी माहिती पुढे आली.
अमोल काळेसह कर्नाटकच्या विशेष पथकाने अटक केलेल्या अमित बिड्डे आणि गणेश मिस्कीन यांचाही या कटात सहभाग असल्याचे आरोपींनी चौकशीत सांगितले. त्यामुळे महाराष्ट्र एटीएसने या तिघांचा ताबा घेतला. या तिघांच्या चौकशीतून आणखी बरीच माहिती पुढे येण्याची शक्यता असल्याचे एटीएसच्या अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.