जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
देशातील चौदा भोंदूबाबांची यादी जाहीर करणारे अखिल भारतीय आखाडा परिषदेचे प्रवक्ता महंत मोहनदास गेल्या दहा दिवसांपासून अचानक बेपत्ता झाले आहेत. विशेष म्हणजे भोंदूबाबांची यादी जाहीर केल्यानंतर अवघ्या चार दिवसांतच ते गायब झाले आहेत. यावरुन त्यांचा घातपात झाल्याचा संशय बळावला आहे. सरकारने त्यांचा शोध घ्यावा, अशी मागणी त्र्यंबकेश्वर येथील आखाडा परिषदेने केली आहे.
महंत मोहनदास हे आखाडा परिषदेचे प्रवक्ता आहेत. 15 सप्टेंबर 2017 रोजी ते हरिद्वार येथून मुंबईला येण्यासाठी निघाले होते. मात्र, त्यानंतर ते उतरून गेले, की त्यांचे काही बरेवाईट झाले हे कोणीही सांगू शकलेले नाही त्यांच्या सीटजवळ त्यांचे कपडे आदी साहित्य आढळून आले. मात्र, साधूंजवळ बटवा असतो, तो मात्र नव्हता. या बटव्यात रोख रक्कम आणि त्यांच्या अंगावर काही दागिनेदेखील आहेत.
अर्थात महंत मोहनदास यांच्याजवळ असलेल्या रोकडमुळे काही दगाफटका झाला आहे, की काही दिवस अगोदर आखाडा परिषदेने जाहीर केलेल्या भोंदूबाबांच्या यादीने दुखावलेल्या एखाद्या भोंदूबाबाच्या समर्थकाने घातपात केला याबद्दल संशय व्यक्त होत आहे. महंत मोहनदास यांचे अपहरण झाले, की ती स्वतःच निघून गेले आहेत, याबाबत संभ्रमावस्था आहे.
रेल्वे प्रशासनाने देखील याबाबत दखल घेण्याची गरज असून केंद्र सरकारने याबाबत सखोल चौकशी केली पाहिजे, अशी मागणी आखाडा परिषदेने केली आहे. साधूंना त्रास देणाऱ्या भोंदूबाबांच्या समर्थकांपासून संरक्षण दिले पाहिजे असल्याची मागणीही त्र्यंबकेश्वर येथील आखाडा परिषदेने केली आहे.