सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, कोल्हापूरातील नांदणी येथील जैन मठातील महादेवी उर्फ माधुरी हत्तीणीला 28 जुलै 2025 रोजी अनंत अंबानींच्या वनतारा अभयारण्यात पाठवण्यात आले. तेव्हापासून तिला परत आणण्यासाठी नांदणी मठाच्या कार्यकर्त्यांनी सातत्याने प्रयत्न सुरू होते. अखेर त्यांच्या या प्रयत्नांना यश आले आहे. ही हत्तीणी येत्या काही महिन्यात पुन्हा कोल्हापूर जिल्ह्यातील नांदणी मठात परतणार असल्याची बातमी समोर आली आहे.
महादेवीच्या निवासासाठी आवश्यक असणाऱ्या सुविधा, सुरक्षितता आणि देखभालीकडे पाहता या हत्तीणीला वनतारामध्ये नेण्यात आले होते. मात्र आता नांदणी मठात महादेवी हत्तीणीसाठी आवश्यक सोयी-सुविधा उभारण्याचे काम नांदणी मठ आणि वनतारा यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू आहे. याचाच आढावा घेण्यासाठी माधुरी हत्तीनीच्या पुनर्वसन केंद्राची पाहणी करण्यासाठी वनताराची टीम कोल्हापुरात दाखल झाली होती. यापूर्वी नियोजित केलेली पुनर्वसन केंद्राची जागा अडथळा ठरत असल्याने पर्यायी जागा पाहणी केली जात आहे.
नांदणी मठ परिसरातील हातिणीच्या पूर्वीच्याच निवारा केंद्राच्या ठिकाणी वनतराची टीम पाहणी करत असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. प्रायोगिक तत्त्वावर परिसराची डागडुजी केली जात आहे. दरम्यान नांदणी मठ परिसरात महादेवी हत्तीच्या वास्तव्याची संपूर्ण व्यवस्था पूर्ण झाल्यानंतर, संबंधित HPC कडे पाठपुरावा करून महादेवी हत्तीला पुन्हा नांदणी मठात आणण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. नांदणी मठाकडून देखील सोशल मीडियावर नुकतीच पोस्ट करून याबाबतचा दुजोरा दिला आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, नांदणी येथील जैन मठातील माधुरी हत्तीणीला अनंतर अंबानींच्या वनतारा अभयारण्यात पाठवण्यात आले. यावरून नांदणीतील आणि आजूबाजूच्या गावांमधील ग्रामस्थ, कोल्हापुरातील जनता यांनी रिलायन्स, जिओ, अनंत अंबानी, मुकेश अंबानी यांच्याविरोधात आंदोलन सुरू केले. वर्षभर सुरू असलेल्या या तीव्र आंदोलनामुळे अखेर वनतारा संस्थेने अधिकृत निवेदन जारी करत दिलगिरी व्यक्त केली होती. तसेच, नांदणीत योग्य सोयी-सुविधा करून त्यानंतर हत्तीणीला तेथे परत पाठवण्याची तयारी दर्शवली होती. त्यानंतर आता कोल्हापूर जिल्ह्यातील नांदणी मठातील महादेवी हत्तीच्या पुनरागमनाचा मार्ग आता मोकळा झाला आहे.