आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या तणावपूर्ण परिस्थितीचा परिणाम इंधन पुरवठ्यावरही झाला होता. यामुळे गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल, डिझेल आणि सीएनजीच्या दरांमध्ये सातत्याने वाढ होताना दिसून येत आहे, अशातच आजपासून म्हणजेच 1 जूनपासून गॅस कंपन्यांनी व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या दरात पुन्हा एकदा वाढ केली आहे.
यामुळे सर्वसामान्य जनतेला पुन्हा एकदा महागाईचा मोठा फटका बसला आहे. दरम्यान 19 किलोच्या व्यावसायिक सिलेंडरच्या दरात 42 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे 3,071.50 रुपयांनी मिळणारा गॅस सिलेंडर आता 3,113.50 रुपयांना मिळणार आहे. याचसोबत दिल्लीत 5-किलोग्राम एफटीएल सिलेंडरच्या दरात 11 रुपयांची वाढ झाली असून, त्याची किंमत 821.50 रुपये असेल. हे नवीन दर आज 1 जूनपासून लागू झाले आहेत.
मे महिन्यानंतर बरोबर एका महिन्याने पुन्हा गॅस सिलेंडरच्या दरात वाढ करण्यात आली आहे. मात्र घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किमती स्थिर राहिल्या आहेत यामुळे महागाईने त्रस्त असलेल्या लाखो कुटुंबांना दिलासा मिळाला आहे. पश्चिम आशियातील भू-राजकीय अस्थिरतेमुळे कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे, जागतिक ऊर्जा संकटामुळे एलपीजी दरवाढ मोठी वाढ झाली आहे. व्यावसायिक सिलिंडरचा वापर हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि लहान व्यवसायांकडून केला जातो. त्यामुळे आता बाहेर जेवण करणे अधिक महाग होणार आहे.
हेही वाचा- मुंबई MHADA लॉटरीला तुफान प्रतिसाद; 2,640 घरांसाठी हजारो अर्जदारांची झुंबड, किती जणांनी भरली अनामत रक्कम?
प्रमुख शहरातील नवे दर काय?
राजधानी दिल्लीत 3,071.50 रुपयांनी मिळणारा गॅस सिलेंडर आता 3,113.50 रुपयांना मिळणार आहे.
मुंबईमध्ये 3,024 रुपयांना मिळणारा गॅस सिलेंडर आता 3,067.50 रुपयांना मिळणार आहे.
कोलकातामध्ये 53.50 रुपयांची वाढ झाली असून 3,202.00 रुपयांना मिळणारा गॅस सिलेंडर आता 3,255.50 रुपयांना मिळणार आहे.
चेन्नईत 3,237 रुपयांना मिळणारा गॅस सिलेंडर आता 3,283 रुपयांना मिळणार आहे.
बेंगळुरूत कमर्शिअल सिलिंडरसाठी आता 3,198 रुपये मोजावे लागतील.
लखनौमध्ये आजपासून नवीन दर 3,236 रुपये झाला आहे.
जयपूरमध्ये कमर्शिअल सिलिंडर 3,155 रुपयांना विकला जात आहे.