पंजाबमधील ‘वारीस पंजाब दे’ संघटनेचे प्रमुख खलिस्तान समर्थक अमृतपाल सिंग यांच्या समर्थकांनी गुरुवारी गोंधळ घातला. अमृतपाल यांचा सहकारी लवप्रीत तुफान याच्या अटकेच्या निषेधार्थ त्याच्या समर्थकांनी अजनाळा पोलीस ठाण्याबाहेर गोंधळ घातला. यानंतर अजनाळा न्यायालयाने शुक्रवारी लवप्रीत तुफानला सोडण्याचे आदेश दिले आहेत. पंजाब पोलिसांच्या एका पोलिस उपअधीक्षकाने लवप्रीत सिंग उर्फ तुफानची कोठडीतून सुटका करावी कारण तो या प्रकरणात सहभागी नसल्याच्या नसल्याचे सांगत त्याच्या सुटकेसाठी न्यायालयात अर्ज केला होता.
‘वारिस पंजाब दे’ संघटनेचे प्रमुख अमृतपाल आणि त्याच्या साथीदारांविरुद्ध चमकौर साहिब वरिंदर सिंग यांचे अपहरण करून त्यांच्यावर प्राणघातक हल्ला केल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यानंतर पोलिसांनी कारवाई केली होती. याप्रकरणी अमृतपालचा निकटवर्तीय लवप्रीत तुफान याला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्यानंतर अमृतपाल सिंग यांच्या समर्थकांनी अजनाळा पोलीस ठाण्याबाहेर गोंधळ घातला. यावेळी पोलिसांवर हल्ला झाला. यामध्ये सहा पोलीस जखमी झाले असून, त्यांना अजनाळा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.