पुणे-मुंबई प्रवास म्हणजे वेळेत लोणावळा गाठले तरी तिथे गाडी थांबेल की काय, ही सततची धाकधूक प्रवाशांच्या मनात असायची. अनेकदा मालगाड्यांमुळे प्रवासी रेल्वे गाड्या लोणावळ्यात थांबून राहायच्या आणि प्रवासाचा वेळ वाढायचा. मात्र आता हेच टेंशन कायमचे संपणार आहे. लोणावळा स्थानकावरील नव्या रेल्वे सुधारणांमुळे प्रवासी गाड्यांना अनावश्यक थांबा टाळता येणार असून, पुणे-मुंबई प्रवास अधिक वेगवान आणि वेळेत पूर्ण होणार आहे.
पुणे-मुंबई-पुणे मार्गावर प्रवास करणाऱ्या लाखो रेल्वे प्रवाशांसाठी एक दिलासादायक आणि आनंद देणारी बातमी आता समोर आली आहे. लोणावळा रेल्वे स्थानकावर करण्यात आलेले यार्ड रिमॉडेलिंग आणि रिसेप्शन डिस्पॅच लाईनचे काम यशस्वीपणे पूर्ण झाले असून, याचा थेट फायदा आता प्रवासी गाड्यांना होणार आहे. यापुढे प्रवासी रेल्वेगाड्यांना मालगाड्यांमुळे थांबावे लागणार नाही, त्यामुळे प्रवास अधिक सुरळीत होणार आहे.
या प्रकल्पांतर्गत लोणावळा स्थानकावरील रेल्वे मार्गाची लांबी सुमारे 150 मीटरने वाढवण्यात आली आहे. तसेच दोन नवीन लूप लाईन्स सुरू करण्यात आल्या आहेत. यामुळे रेल्वेगाड्यांची हाताळणी अधिक वेगवान, सुरक्षित आणि कार्यक्षम झाली आहे. मुख्य लाईन आता प्रामुख्याने प्रवासी गाड्यांसाठी मोकळी राहणार असून, मालगाड्यांसाठी स्वतंत्र लूप लाईन्स उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
यार्डमधील अप आणि डाउन मार्गिकांचीही लक्षणीय वाढ करण्यात आली आहे. पूर्वी सुमारे 700 मीटर असलेली मार्गिका आता 850 मीटरपेक्षा अधिक लांब करण्यात आली आहे. त्यामुळे मोठ्या मालगाड्या बँकर इंजिनसह सहजपणे या मार्गिकेत उभ्या राहू शकतील.
यापूर्वी पुणे–मुंबई मार्गावर मालगाड्यांमुळे प्रवासी गाड्यांना 15 ते 20 मिनिटे थांबावे लागत होते, मात्र आता हा विलंब इतिहासजमा होणार आहे. बँकर इंजिन जोडणे किंवा काढणे यासाठी लागणारा वेळही मोठ्या प्रमाणात कमी झाला आहे. आधी या प्रक्रियेसाठी 15 ते 20 मिनिटे विनाकारण लागायचे, पण नव्या लूप लाईन्समुळे ही प्रक्रिया जलद आणि सुलभ झाली आहे. त्यामुळे मुख्य लाईनवरील वाहतूक अखंडित राहणार असून प्रवासी गाड्यांना प्राधान्य मिळेल.
या सुधारणांमुळे लोणावळा स्थानकावरील मालवाहतूक अधिक कार्यक्षम होणार असून, प्रवाशांचा मौल्यवान वेळ वाचणार आहे. पुणे-मुंबई-पुणे रेल्वे प्रवास आता अधिक आरामदायक, सुरक्षित आणि वेळेत पूर्ण होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. रेल्वे प्रशासनाच्या या उपक्रमामुळे नियमित पुणे मुंबई प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या चेहऱ्यावर नक्कीच आनंद दिसणार आहे.