यंदाचे वर्ष सरत असताना नागरिक नव्या वर्षाच्या जल्लोषात स्वागत करण्याच्या तयारीत आहेत. तर दुसरीकडे राज्यात गेल्या काही दिवसांपासून ओमायक्रॉनसह पुन्हा कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. त्यामुळे राज्य शासनाने नव वर्षासाठी नवी नियमावली जाहीर केली आहे. दरम्यान राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी नागरिकांना टाळेबंदी लागण्याचा इशारा दिला आहे. नागरिकांना कोरोना नियम पाळले नाही तर टाळेबंदीशिवाय पर्याय उरणार नाही, असे राज्य गृहमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे.
नागरिकांनी कोरोनाचे सर्व नियम पाळणे बंधनकारक आहे. नागरिकांना पार्टी करण्यासाठी पूर्ण वर्ष आहे मात्र सद्यपरिस्थिती लक्षात घेऊनच नव्या वर्षाचे स्वागत करण्याचे राज्याच्या गृहमंत्र्यांनी सांगितले आहे. कोरोना नियम न पाळणाऱ्या नागरिकांवर कारवाई करण्याचे आदेश आम्ही पोलिसांना दिल्या आहेत. त्यामुळे जर नागरिकांनी नियम पाळले नाही, गर्दी टाळली नाही तर पोलिस त्या नागरिकांवर कारवाई करतील, त्यामुळे पोलिसांवर कारवाई करण्याची वेळ आणू नका, असे राज्य गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी सांगितले आहे.