विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी सोमवारी मतदान प्रक्रिया पार पडली. विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी १० जागांसाठी ११ उमेदवार रिंगणात उतरले आहेत. त्यामुळे ही निवडणूक चांगलीच चुरशीची ठरणार आहे. विधानपरिषदेच्या दहाव्या जागेसाठी भाजप विरुद्ध काँग्रेस असा सामना होणार आहे. त्यामुळे भाजपचे प्रसाद लाड आणि काँग्रेसचे भाई जगताप यांच्यात खरी लढत होणार आहे.
दरम्यान, भाजपाचा पाचवा उमेदवारही निवडून आणू, असा दावा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. विधानपरिषद निवडणूक जिंकण्यासाठी उमेदवाराला २७ मतांची आवश्यकता आहे. भाजपकडे १२३ संख्याबळ आहे. त्यामुळे भाजपा विधानपरिषदेच्या चार जागांवर सहज विजय मिळवू शकतो. तर पाचव्या जागेसाठी भाजपाला १२ मते कमी पडत आहेत. तर अपक्ष आणि छोट्या पक्षांनी भाजपला मतदान केल्यास भाजपचा पाचवा उमेदवारही जिंकू शकतात. याच, पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांनी सर्व उमेदवारांच्या विजयाचा विश्वास व्यक्त केला आहे.
भाजपचे संख्याबळ लक्षात घेता भाजपचे चार उमेदवार सहज जिंकू शकतात. मात्र, संख्याबळ नसताना भाजप पाचवी जागा कशी जिंकणार? असा सवाल उपस्थित होत आहे. भाजपचे उमेदवार प्रसाद लाड यांच्यासाठी भाजपला अतिरिक्त १२ मतांची गरज आहे. त्यामुळे भाजपची पाचवी जागाही विजयी होण्यासाठी प्रसाद लाड यांची धाकधूक वाढली आहे.