Latur: धवेलीच्या दलित स्मशानभूमीचा प्रश्न अखेर मिटला

धवेलीच्या दलित स्मशानभूमीचा प्रश्न अखेर मिटला आहे. जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीमुळे गावकऱ्यांना हक्काची स्मशानभूमी मिळाली आहे. त्यामुळे समाजात बदल घडला.

Latur: धवेलीच्या दलित स्मशानभूमीचा प्रश्न अखेर मिटला

अजय घोडके, प्रतिनिधी, लातूर : लातूरच्या रेणापुर तालुक्यातील धवेली येथील पिढ्यानपिढ्यापासून सुरू असलेला दलित स्मशानभूमीचा प्रश्न 'जय महाराष्ट्र' वृत्त वाहिनीच्या बातमीमुळे कायमचा मिटल्याने जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीच्या बातमीचा लातूर जिल्ह्यामध्ये मोठा परिणाम पाहायला मिळत आहे.

रेणापुर तालुक्यातील मौजे धवेली हे गाव हक्काच्या दलित समशानभूमीपासून वंचित होते. पिढ्यानपिढ्या हक्काच्या स्मशानभूमीसाठी येथील ग्रामस्थांनी शासन दरबारी आपली हकीकत मांडली. गावातील तानाजी बोयने नावाच्या इसमाने दलित समाजातील भाबड्या ग्रामस्थांची रेशन व इतर सुविधांसाठी  कागदपत्रे बनवत असल्याचे भासवून कोऱ्या कागदावर खोट्या सह्या घेतल्या. त्याआधारे रेणापुर तहसीलचे तत्कालीन नायब तहसीलदार, मंडल अधिकारी, तलाठी यांना हाताशी धरून धवेली येथील गावकऱ्यांना  दलित समशानभूमीची आवश्यकता नसल्याची खोटी कागदपत्रे तयार केली. ही बाब लक्षात आल्यानंतर गावातील सुशिक्षित तरुणांनी पिढ्यानपिढ्याचा  समशानभूमीचा संघर्ष  सन 2019 पासून अधिक तीव्र केला. परंतु शासन दरबारी अनेक प्रयत्न करूनही या समस्येवर तोडगा निघत नव्हता. 8 फेब्रुवारी, 2025 रोजी धवेली येथील एका व्यक्तीचे निधन झाले. अंत्यविधीसाठी प्रेत स्मशानभूमीत आणण्यात आले. परंतु तानाजी बोयने नावाच्या इसमाने तब्बल 24 तास अंत्यविधी होऊ दिला नाही. त्यानंतर दुसऱ्या दिवशी 9 फेब्रुवारी रोजी जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीने 'अंत्यविधी विना प्रेताची 24 तास विटंबना' या मथळ्याखाली वृत्त प्रसारित केले. या बातमीमुळे लातूर जिल्ह्यासह राज्याच्या विविध भागात दलित नेते, सामाजिक कार्यकर्ते यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. घटनेचे पडसाद समाज माध्यमात उमटले. काही दलित नेत्यांनी लातूर जिल्हा प्रशासनाला दूरध्वनीवरून संपर्क साधत दलित स्मशानभूमीसाठी जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीने घेतलेली भूमिका सामाजिक न्यायाची असल्याचे सांगितले.

हेही वाचा : संजय गायकवाड यांना समज द्या; फडणवीसांचा एकनाथ शिंदेंना सल्ला

बातमीची लातूर जिल्हा प्रशासनाने गंभीर दखल घेत लातूरच्या उपविभागीय अधिकारी रोहिणी नरे विरोळे यांना चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले. रेणापुर तहसील कार्यालयाकडून माहिती कागदपत्रे प्राप्त झाल्यानंतर उपविभागीय अधिकाऱ्यांनी सुनावणी घेऊन धवेली ग्रामस्थांना दलित स्मशानभूमी उपलब्ध करून देण्याचे आदेश दिले. परंतु आदेशानंतरही धवेली येथील सदरील जागेचे रेखांकन करण्यासाठी रेणापुर तहसील प्रशासनाने दिरंगाई करत तब्बल सव्वा महिना हा विषय लटकवून ठेवला. धवेलीच्या ग्रामस्थांनी अखेर रेणापुर तहसील कार्यालयसमोर बेमुदत साखळी उपोषण सुरू केले. रेनापुर तहसील प्रशासनाला जाब विचारल्यानंतर अखेर 24 एप्रिल रोजी रेणापुर तहसीलदार मंजुषा भगत यांनी धवेली येथील स्मशानभूमीच्या जागेचे रेखांकन तहसील व पोलीस प्रशासनातील अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत करण्याचे आदेश काढले. पिढ्यानपिढ्यापासून सुरू असलेला दलित समशानभूमीच्या लढ्याला अखेर यश आले. त्यामुळे जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीने दाखवलेल्या बातमीचा परिणाम म्हणून अखेर दलित स्मशानभूमीला मूर्त स्वरूप मिळाले. त्यामुळे ग्रामस्थांनी जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीचे आभार मानले. सामाजिक न्यायाच्या लढ्यात  जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीने घेतलेल्या भूमिकेचे सर्व स्तरातून कौतूक होत आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number