ना बँडबाजा ना शाही थाट….अवघ्या 200 रुपयांत रेशीमगाठ; लातूरच्या जोडप्यांची नवी परंपरा

लातूरमध्ये 450 जोडप्यांनी अवघ्या 200 रुपयांत साधेपणाने विवाह करून खर्चिक लग्नसंस्कृतीला दिलं पर्याय, समाजासमोर ठेवला आदर्श

ना बँडबाजा ना शाही थाट….अवघ्या 200 रुपयांत रेशीमगाठ; लातूरच्या जोडप्यांची नवी परंपरा

लातूर: सध्या संपूर्ण देशात लग्नसराईची धूम सुरु आहे. एका बाजूला शाही थाटात, धूमधडाक्यात होणाऱ्या विवाहसोहळ्यांमुळे लाखोंचा खर्च केला जातो, तर दुसऱ्या बाजूला लातूर जिल्ह्यातील तब्बल 450 जोडप्यांनी अवघ्या 200 रुपयांत नोंदणी पद्धतीने विवाह करून समाजासमोर एक आदर्श ठेवला आहे. ना बँडबाजा, ना शाही थाट… फक्त 200 रुपयांत जीवनाच्या रेशीमगाठी ही संकल्पना आता ग्रामीण भागातील युवकांमध्येही लोकप्रिय होत आहे.

लातूर शहरासह ग्रामीण भागात लग्नाचा थाटमाट करणे ही मानसिकता अनेकांच्या मनात घट्ट बसलेली आहे. मंगल कार्यालये, पंचपक्वान्न असलेली मेजवानी, दागिने, महागडे पोशाख, डीजे आणि प्री-वेडिंग फोटोशूट या सर्व गोष्टींसाठी लाखो रुपयांचा खर्च केला जातो. काही वेळा हे सर्व खर्च फक्त समाजात स्टेटस दाखवण्यासाठीच केले जातात. यासाठी अनेक कुटुंबांना कर्ज घ्यावे लागते आणि परिणामी पुढे आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो.

हेही वाचा: महाराणा प्रताप जयंती 2025; तारीख, वेळ आणि त्यांच्या जीवनावर एक नजर

मात्र लातूर जिल्ह्यात नवविवाहित जोडप्यांनी या सर्व खर्चाला फाटा देत नोंदणी विवाहाचा मार्ग स्वीकारला आहे. ओमकार देबडवार आणि श्रेया मुक्कावार हे नवविवाहित जोडपे म्हणते, लग्न आयुष्यात एकदा होते, पण ते केवळ दिखाव्यासाठी नसून, एकत्र आयुष्य जगण्याचा निर्णय असतो. त्यामुळे आम्ही अनावश्यक खर्च टाळून नोंदणी पद्धतीने लग्न केले.

याच निर्णयाचं कौतुक त्यांच्या पालकांनीही केलं. श्रेयाचे वडील शाम मुक्कावार सांगतात, पूर्वी मुलीचं लग्न म्हणजे डोक्यावर कर्जाचं ओझं, पण आता काळ बदलला आहे. मुलगी शिकलेली आहे, समजूतदार आहे. तिने आम्हाला समजावून सांगितलं आणि आम्हीही हा निर्णय घेतला. ओमकारचे वडील संजय देबडवार यांनीही या निर्णयाचं स्वागत केलं आहे.

लातूर जिल्ह्यातील अनेक शेतकरी कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या करत असल्याचे वास्तव आहे. मागील पाच वर्षांत जिल्ह्यात 350 पेक्षा अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्येचा मार्ग स्वीकारल्याची नोंद शासनाकडे आहे. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांची सुशिक्षित मुले आता खर्चिक लग्न सोडून नोंदणी विवाहाकडे वळत आहेत. विवाह नोंदणी अधिकारी व्यंकट डोके यांनी सांगितले की, युवकांमध्ये आता सामाजिक जाण वाढली आहे. शेतकरी कुटुंबातील मुले आर्थिक शहाणपणा दाखवत नोंदणी पद्धतीने विवाह करत आहेत.

शासनाकडूनही नोंदणी विवाह करणाऱ्या जोडप्यांना विविध योजनांद्वारे प्रोत्साहन दिले जात आहे. यामुळे डेस्टिनेशन वेडिंगच्या काळातही नोंदणी वेडिंगची नवी दिशा समाजासमोर येत आहे. लातूरमधील या 450 जोडप्यांनी खर्चिक विवाहप्रथा बाजूला ठेवून केवळ 200 रुपयांत विवाह करून एक नवीन सामाजिक चळवळ सुरू केली आहे.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number