मुंबई : मुसळधार पावसामुळे मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील (एक्स्प्रेसवे) नव्याने सुरू झालेल्या ‘मिसिंग लिंक’च्या बोगदा क्रमांक 2 च्या बाहेरच्या भागात दरड कोसळली. या घटनेनंतर, सोमवारच्या पहाटे पुणे-मुंबई मार्गिकेवरील वाहतूक वळवण्यात आली, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी खबरदारीचा उपाय म्हणून पहाटे 4 वाजल्यापासून वाहतूक वळवण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (MSRDC) सांगितले. महामार्ग वाहतूक पोलिसांच्या समन्वयाने प्रशासन परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. तसेच वाहनचालकांना अत्यंत आवश्यक असल्याशिवाय या मार्गावरून प्रवास न करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
महामार्ग वाहतूक पोलीस नियंत्रण कक्षाने सांगितले की, मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील (एक्सप्रेस-वे) खंडाळा घाटात पाणी साचल्यामुळे आणि दरड कोसळल्यामुळे वाहतुकीवर परिणाम झाला असून, त्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली आहे. ‘मिसिंग लिंक’वरील मुंबईकडे जाणारी मार्गिका बंद केल्यामुळे वाहने लोणावळामार्गे वळवण्यात आली आहेत. परिणामी वाहतुकीची मोठी कोंडी झाली आहे. सांगलीहून मुंबईकडे जाणाऱ्या एका वाहनचालकाने ‘पीटीआय’ या वृत्तसंस्थेला सांगितले की, वाहतूक वळवल्यानंतर पहाटे 4 वाजल्यापासून तो लोणावळ्याजवळ अडकून पडला आहे.
#WATCH | Maharashtra: A major landslide occurred on the Missing Link section of the Mumbai–Pune Expressway near the Khandala Exit. Consequently, the Mumbai-bound lane has been completely closed. According to preliminary information, no casualties have been reported. Efforts are… pic.twitter.com/pRUSGhHabx — ANI (@ANI) July 6, 2026
सुमारे दोन महिन्यांपूर्वी उद्घाटन झालेला ‘मिसिंग लिंक’ हा प्रकल्प मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील 13 किमी लांबीचा एक ‘बायपास’ (पर्यायी मार्ग) आहे. जो सह्याद्रीच्या डोंगररांगांतून जातो. खंडाळा घाटातील वाहतूक कोंडी कमी करण्याच्या उद्देशाने तयार करण्यात आलेल्या या मार्गामुळे प्रवासाचे अंतर सुमारे 6 किमीने कमी होते. तसेच पुणे आणि मुंबई दरम्यानचा प्रवासाचा वेळ अंदाजे 25 ते 30 मिनिटांनी वाचतो. दरम्यान, सोमवारी सकाळी मुसळधार पावसामुळे मुंबई आणि पुणे दरम्यानची दळणवळण व्यवस्था ठप्प झाली. भूस्खलन आणि पूरस्थितीमुळे रेल्वे सेवा स्थगित झाली आणि मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग तसेच जुना मुंबई-पुणे महामार्ग दोन्ही बंद झाले. ज्यामुळे प्रवासी अडकून पडले. परिणामी, दोन्ही शहरांमधील प्रवासात मोठा व्यत्यय आला. रेल्वे प्रशासनाच्या माहितीनुसार, मुसळधार पावसामुळे किमान 16 गाड्या रद्द करण्यात आल्या. तर इतर नऊ गाड्या वळवण्यात आल्या, तर भारतीय हवामान विभागाने (IMD) मुंबईसाठी ऑरेंज अलर्ट आणि पुण्यासाठी रेड अलर्ट जारी केला. पोलिसांनी एका सार्वजनिक सूचनेद्वारे प्रवाशांना हवामान सुधारेपर्यंत पुणे आणि मुंबई दरम्यान प्रवास टाळण्याचे आवाहन केले आहे.