Land Property Rules: जमिनीचा हक्क सुरक्षित ठेवायचाय? मोजणी, नोंदी आणि कायदेशीर प्रक्रिया समजून घ्या

मोजणीदरम्यान दोन्ही बाजूंना नोटीस दिली जाते आणि प्रत्यक्ष मोजमाप करून सीमारेषा निश्चित केल्या जातात. या मोजणी अहवालातून अतिक्रमण झाले आहे की नाही, तसेच कोणाची जमीन कुठे आहे, हे स्पष्ट होते.

Land Property Rules: जमिनीचा हक्क सुरक्षित ठेवायचाय? मोजणी, नोंदी आणि कायदेशीर प्रक्रिया समजून घ्या

मुंबई: ग्रामीण भागात जमीन ही केवळ मालमत्ता नसून शेतकऱ्याच्या उपजीविकेचा आणि ओळखीचा कणा मानली जाते. मात्र जमीन वाटणी, सीमारेषा, रस्ता हक्क किंवा वडिलोपार्जित जमिनीच्या विभाजनावेळी अनेकदा गैरसमज आणि वाद निर्माण होतात. शेजाऱ्यांकडून अतिक्रमणाचा संशय किंवा हक्कावरून होणारे दावे शेतकऱ्यांसाठी मोठी डोकेदुखी ठरतात. अशा वेळी योग्य कायदेशीर माहिती नसल्यास शेतकरी अडचणीत सापडू शकतो. त्यामुळे जमिनीच्या वादात हक्क सुरक्षित ठेवण्यासाठी कायदेशीर प्रक्रिया समजून घेणे अत्यंत आवश्यक आहे.

जमिनीबाबत कोणताही दावा करण्यापूर्वी शेतकऱ्यांनी आपल्या जमिनीची सर्व मूळ कागदपत्रे तपासणे आवश्यक आहे. 7/12 उतारा, 8अ उतारा, फेरफार नोंदी, खरेदीखत, वाटणीपत्र, वारस नोंद आणि मोजणी नकाशा ही कागदपत्रे विशेष महत्त्वाची मानली जातात. या नोंदींमधून जमिनीचा सर्वे नंबर, गट नंबर, क्षेत्रफळ आणि सीमारेषा स्पष्टपणे समजतात. शेजाऱ्याने जमीन असल्याचा दावा केल्यास, त्याची नोंद अधिकृत महसूल रेकॉर्डमध्ये आहे की नाही, हेही तपासणे गरजेचे आहे.

हेही वाचा: Mumbai Local Train: मुंबई लोकल प्रवास अधिक सुरक्षित होणार? नॉन-एसी लोकलसाठी नवा प्रयोग

जमिनीच्या वादात सर्वात ठोस आणि विश्वासार्ह पुरावा म्हणजे शासकीय मोजणी. यासाठी तालुक्याच्या भूमी अभिलेख कार्यालयात अर्ज करून अधिकृत मोजणी करून घ्यावी. मोजणीदरम्यान दोन्ही बाजूंना नोटीस दिली जाते आणि प्रत्यक्ष मोजमाप करून सीमारेषा निश्चित केल्या जातात. या मोजणी अहवालातून अतिक्रमण झाले आहे की नाही, तसेच कोणाची जमीन कुठे आहे, हे स्पष्ट होते. मोजणीमध्ये चुकीची नोंद किंवा वाटणीवेळी अन्याय झाल्याचे निदर्शनास आल्यास, संबंधित तहसील कार्यालयात तक्रार दाखल करता येते. तहसीलदारांकडे अर्ज करून फेरफार दुरुस्ती, चुकीची नोंद रद्द करणे किंवा योग्य नोंद करण्याची मागणी करता येते. महसूल अधिकारी चौकशी करून निर्णय देतात आणि अनेक प्रकरणांमध्ये याच टप्प्यावर वाद सुटू शकतो.

महसूल स्तरावर प्रश्न सुटला नाही किंवा शेजाऱ्याने बळजबरीने जमीन ताब्यात घेतली असल्यास, शेतकऱ्यांना दिवाणी न्यायालयात दाद मागता येते. न्यायालयात हक्क व ताबा, स्थगिती आदेश किंवा सीमारेषा निश्चिती यासंबंधी दावा दाखल करता येतो. 

अनेकदा परस्पर समजोता करून वाटणी केल्यामुळे पुढे मोठे वाद निर्माण होतात. त्यामुळे जमीन वाटणी करताना लेखी आणि नोंदणीकृत वाटणीपत्र करणे अत्यावश्यक आहे. नोंदणीकृत वाटणीपत्रामुळे भविष्यात शेजारी किंवा नातेवाईकांकडून दावा झाला तरी शेतकऱ्याला कायदेशीर संरक्षण मिळते. जमीन ही शेतकऱ्याच्या उपजीविकेचा आधार असल्याने, प्रत्येक टप्प्यावर योग्य माहिती, वेळेवर मोजणी आणि अधिकृत मार्गानेच निर्णय घेणे हेच शेतकऱ्यांच्या हक्कांचे खरे संरक्षण ठरते.

हेही वाचा: Slum Cluster Redevelopment: मुंबईचा चेहरामोहरा बदलणार; 17 भागांत एकत्रित झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्पाची उपमुख्यमंत्री शिंदेची घोषणा

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number