मुंबईतील सर्वात लोकप्रिय सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ असलेल्या लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी दरवर्षी अनेक दिग्गज हजेरी लावतात. यंदा या मांदियाळीत भर पडली आहे मुंबई इंडियन्सचा माजी कर्णधार आणि टीम इंडियाचा हिटमॅन रोहित शर्माची. रोहित शर्माने रविवारी पत्नी रितिका सजदेहसह लालबागच्या राजाचे दर्शन घेतले. यावेळी चाहत्यांनी ‘रोहित… रोहित’ चा जयघोष करत त्याला घेरले. रोहितनेही हात उंचावून चाहत्यांना अभिवादन केले. आगामी वनडे वर्ल्ड कप 2027 च्या तयारीपूर्वी बाप्पाचा आशीर्वाद घेण्यासाठी रोहित आल्याची चर्चा आहे.
मैदानावर धुवाधार खेळी करणारा हिटमॅन आता मनोरंजन विश्वातही आघाडीवर आहे. सोनी टीव्ही वरील त्याचा नवा शो ‘Family Full House With Rohit Sharma’ मध्ये तो प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन करत आहे. तसेच अनेक मोठ्या ब्रँडचा चेहरा असलेल्या रोहितची सोशल मीडियावरही मोठी फॅन फॉलोइंग आहे. त्याच्या हटके अंदाजामुळे तो चाहत्यांमध्ये कायम चर्चेत असतो.
भारतीय क्रिकेटमधील योगदानासाठी रोहित शर्माला 2015 साली अर्जुन पुरस्कार आणि 2020 साली देशातील सर्वोच्च क्रीडा सन्मान मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्काराने गौरवण्यात आले आहे.