शिक्षण विभागात प्रशासन अधिकारी असल्याचे सांगून ४५ जणांची लाखो रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी शैलेजा दराडे यांच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणात तब्बल पाच कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. शैलजा दराडे या सध्या राज्य परीक्षा परिषदेच्या उपायुक्त आहेत.
याप्रकरणी सांगली जिल्ह्यातील एका ५० वर्षाच्या शिक्षकाने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी दादासाहेब रामचंद्र दराडे (रा. अकोले, ता. इंदापूर) आणि शैलेजा रामचंद्र दराडेअशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शैलजा उत्तम खाडे आणि दादासाहेब दराडे हे भाऊ बहीण आहेत. दादासाहेब दराडे याने शैलजा दराडे या शिक्षण विभागात प्रशासन अधिकारी असल्याचे सांगून फिर्यादींचा विश्वास संपादन केला. फिर्यादी यांच्या २ वहिनींना शिक्षक या पदावर नोकरी लावतो, असे सांगून प्रत्येकी १२ लाख व १५ लाख रुपये असे २७ लाख रुपये फिर्यादी यांच्याकडून घेतले. त्यांना आजपर्यंत शिक्षक पदावर नोकरी लावली नाही. तसेच त्यांनी वारंवार मागणी करुन त्यांचे पैसे परत केले नाही. अशाच प्रकारे इतर ४४ जणांचा विश्वास संपादन करुन त्यांची लाखो रुपयांची फसवणूक केली आहे.
शैलजा यांनी आपला दादासाहेब यांच्याशी काहीही संबंध नाही. भाऊ असल्याच्या नात्याने कोणीही त्याच्याबरोबर कसलाही व्यवहार करू नये, अशी जाहीर नोटीस ऑगस्ट २०२०मध्ये दिली होती, जी आमची दिशाभूल करण्यासाठी असावी, असा आरोप सूर्यवंशी यांनी केला आहे. पोलिसांनी दोघांवरही गुन्हा दाखल केला असून सहायक पोलीस निरीक्षक थोरबोले अधिक तपास करीत आहेत.