मुंबई – राज्यातील महिलांसाठी सुरू करण्यात आलेल्या "मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण" योजनेला चांगलाच प्रतिसाद मिळत आहे. अशातच आता पात्र लाभार्थी महिलांना त्यांच्या व्यवसायासाठी कर्ज उपलब्ध करून देण्याचा निर्णय सरकारने घेतला असून, यामुळे महिलांना स्वावलंबनाची नवी दिशा मिळणार आहे.
या विशेष उपक्रमांतर्गत महिलांना व्यवसाय सुरू करण्यासाठी किंवा विस्तारासाठी 1 लाख रुपयांपर्यंत कर्ज दिलं जाणार आहे. यातील सर्वात मोठं आकर्षण म्हणजे हे कर्ज शून्य टक्के व्याजदराने मिळणार आहे. मुंबई बँकेने 3 सप्टेंबरपासून या उपक्रमाची अंमलबजावणी सुरू केली असून, शेकडो महिलांनी याचा लाभ घेण्यास सुरुवात केली आहे. ग्रामीण भागात योजना पोहोचल्यास अनेक महिला सामूहिक व्यवसाय हाती घेऊ शकतील.
हेही वाचा- Maharashtra Weather Updates : पुढील काही तास जोखमीचे! महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्याला रेड अलर्ट
सुरुवातीला या योजनेचा लाभ घेण्यासाठी ई-केवायसीसह काही निकष पूर्ण करणे आवश्यक आहे. मात्र, त्यातून पात्र ठरलेल्या बहिणींना आता कर्जाचीही सुविधा दिली जाणार आहे. मुंबई आणि आसपासच्या भागात या कर्ज योजनेची सुरुवात करण्यात आली असून, लवकरच संपूर्ण महाराष्ट्रात याची अंमलबजावणी होणार आहे.
हेही वाचा- Pune : पुण्यातील उंड्री सोसायटीत भीषण आग; 15 वर्षीय मुलाचा मृत्यू, नऊ जखमी
दरम्यान, "माझी लाडकी बहीण" योजनेअंतर्गत महिलांना दरमहा 1500 रुपये अनुदान दिलं जातं. हे अनुदान 2100 रुपयांपर्यंत वाढविण्याची घोषणा करण्यात आली आहे, मात्र अंमलबजावणीची तारीख अद्याप निश्चित झालेली नाही. मिळणाऱ्या या अनुदानातून कर्जाचे हप्ते वसूल केले जातील. योजनेसाठी आतापर्यंत तब्बल 1,12,70,261 अर्ज प्राप्त झाले असून, त्यापैकी 1,06,69,139 अर्जांना मंजुरी देण्यात आली आहे. या नव्या निर्णयामुळे लाखो महिलांना उद्योग सुरू करण्याची संधी मिळणार असून, आर्थिक स्वावलंबनाचा मार्ग मोकळा होणार आहे.