मुंबई : राज्यातील लाखो महिलांसाठी दिलासादायक ठरलेली मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आता निर्णायक टप्प्यावर आली आहे. दरमहा खात्यात जमा होणारे 1500 रुपये सुरू राहणार की थांबणार, हे आता ई-केवायसीवर अवलंबून आहे. सरकारने स्पष्ट इशारा दिला असून वेळ संपत चालली आहे. आता उशीर केल्यास लाभ कायमचा गमावण्याची शक्यता नाकारता येत नाही. योजना सुरू करताना काही अटी ठरवण्यात आल्या होत्या. मात्र या अटी डावलून काही अपात्र महिलांनीही लाभ घेतल्याचे समोर आल्यानंतर सरकारने कठोर पाऊल उचलले.
ई-केवायसी बंधनकारक करण्यात आली असून ते पूर्ण नसेल तर नाव थेट लाभार्थी यादीतून वगळले जाणार आहे. पात्र असाल तरी ई-केवायसी नसेल तर पैसे मिळणार नाहीत, असा स्पष्ट संदेश सरकारकडून देण्यात आला आहे.
मूळ मुदत नोव्हेंबरपर्यंत होती, मात्र लाखो महिलांची प्रक्रिया अपूर्ण राहिल्याने सरकारने शेवटची संधी देत 31 डिसेंबरपर्यंत मुदत वाढवली. तरीही अनेक महिलांना तांत्रिक अडचणींमुळे ई-केवायसी करता येत नव्हती. ही अडचण दूर करण्यासाठी आता अंगणवाडी सेविका थेट घरोघरी जाऊन ई-केवायसी करणार आहेत.
हेही वाचा: Maharashtra Weather News: राज्यात पारा घसरला ; चार जिल्हे गारठणार, हवामान विभागाचा इशारा
ज्या महिलांची प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नाही, त्यांच्यासाठी ही मोठी संधी आहे. आवश्यक कागदपत्रांची तपासणी करून अंगणवाडी सेविकांकडून ई-केवायसी पूर्ण केली जाणार आहे. त्यामुळे नेट नाही, सिस्टम चालत नाही अशी कारणे आता चालणार नाहीत. मात्र लक्षात ठेवा, 31 डिसेंबरनंतर कोणतीही मुदतवाढ दिली जाणार नाही. त्या तारखेपर्यंत ई-केवायसी न केल्यास दरमहा मिळणारे 1500 रुपये थेट बंद होतील.
सध्या अडीच कोटी महिलांना या योजनेचा लाभ मिळतो, पण वेळेत पावले उचलली नाहीत तर हा आर्थिक आधार हातातून निसटू शकतो. वेळ फार कमी आहे. तुमची कागदपत्रे तयार ठेवा, अंगणवाडी सेविकांशी संपर्क साधा आणि ई-केवायसी आजच पूर्ण करा. कारण कागदपत्रे पुर्तता करायला उशीर झाला, तर लाभ मिळणार नाही हे निश्चित आहे.
हेही वाचा: BMC Election 2025: महायुतीत जागावाटपाचा तिढा; भाजप-शिवसेना समन्वय समितीची निर्णायक बैठक