नवी दिल्ली : 'कुंभमेळा गर्ल' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मोनालिसा भोसलेने चित्रपट निर्माते सनोज मिश्रा आणि वकील अनिल विलायिल यांच्यासह चार जणांविरुद्ध पॉक्सो कायद्याअंतर्गत पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी एर्नाकुलम सेंट्रल येथे गुन्हा दाखल केला आहे. परंतु कथित घटना मध्य प्रदेशात घडल्या असल्याने, तपास तेथे हलवला जाण्याची शक्यता आहे. 'द डायरी ऑफ मणिपूर'च्या चित्रीकरणादरम्यान तिने 29 एप्रिल 2026 रोजी एफआयआर दाखल केली. कोची येथील एका पत्रकार परिषदेत मोनालिसाने सांगितले की, दिग्दर्शकाने सेटवर तिच्याशी अनेक वेळा गैरवर्तन केले. जेव्हा तिने हे तिच्या कुटुंबाला सांगितले. तेव्हा त्यांनी तिला कोणताही पाठिंबा दिला नाही. दुसऱ्या दिवशी न्यायालयात तिचा जबाब नोंदवण्यात आला. पोलिसांनी सांगितले की, ते हे प्रकरण मध्य प्रदेशात हलवण्याचा विचार करत आहेत. कारण हे सर्व तिथेच घडले होते.
मोनालिसा केवळ मिश्रा यांच्यावरच थांबली नाही, तर तिने वकील अनिल विलायिल यांच्यावरही सोशल मीडियावर तिची बदनामी केल्याचा आरोप केला. एफआयआरमधील चार नावांमध्ये विश्व हिंदू परिषदेच्या (VHP) एका नेत्याचेही नाव होते. दरम्यान, या नाट्यात आणखी एक वाद गुंतलेला आहे. मोनालिसाचे फरमानसोबतच्या लग्नाबाबत तिच्या कुटुंबाने दावा केला आहे. लग्नाच्या वेळी ती अल्पवयीन होती, तसेच फरमानने तिला फसवले असून त्याच्यावर 'लव्ह जिहाद'चा आरोप कुटुंबियांनी केला आहे. याबाबत मोनालिसाचे म्हणणे आहे की, हे अजिबात खरे नाही. ती 18 वर्षांची आहे. तसेच फरमानसोबत लग्नाचा निर्णय तिचा होता. मात्र तिच्या वयावरून सुरू असलेला वाद अजूनही शमला नाही.