राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी एनसीबी संचालक समीर वानखेडे यांच्यावर अनेक आरोप केले आहेत. आज त्यांनी समीर वानखेडे यांची मेहुणी आणि क्रांती रेडकर यांची बहिण हर्षदा रेडकर यांच्यावर आरोप केला आहे. समीर वानखेडे यांची मेहुणी हर्षदा रेडकर या ड्रग्ज व्यवसायात असल्याचा आरोप नवाब मलिकांनी केला आहे. त्यामुळे यावर आता हर्षदा रेडकर यांची बहिण क्रांती रेडकर यांनी उत्तर दिले आहे.
क्रांती रेडकर यांनी ट्विट करत सांगितले की, नवाब मलिक यांच्या ट्विटमुळे तुमच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. परंतु मी सांगू इच्छिते की, ‘या सर्व प्रकरणामध्ये माझी बहिण पीडित होती आणि पीडित आहे. हे प्रकरण सध्या न्यायप्रविष्ठ असल्यामुळे यावर प्रतिक्रिया देणे हा समजुतदारपणा ठरणार नाही. माझी बहिण हर्षदा रेडकर मलिक यांनी केलल्या ट्विट विरोधात कायदेशीर कारवाई करणार आहे. मात्र समीर वानखेडे यांचा या प्रकरणाशी काहीही संबंध नाही.’ असे क्रांती रेडकर यांनी ट्विट करत सांगितले.
Will give more updates regarding the same through my twitter handle 🙏🙏 pic.twitter.com/c0aspjowUr — KRANTI REDKAR WANKHEDE (@KrantiRedkar) November 8, 2021
समीर दाऊद वानखेडे यांची मेहुणी हर्षदा दीनानाथ रेडकर ड्रग्जच्या व्यवसायात सहभागी आहेत का? असा प्रश्न मलिकांनी ट्विट करत उपस्थित केला आहे. तसेच वानखेडेंना या प्रश्नाचे उत्तर द्यावे लागेल, कारण या प्रकरणाबाबतचा खटला पुण्यातील न्यायालयात प्रलंबित आहे. तसेच याबाबतचे कागदपत्रे त्यांनी ट्विट करत सादर केली आहेत.
नवाब मलिकांनी केलेल्या या आरोपावर समीर वानखेडे यांनी उत्तर दिले आहे. समीर वानखेडे म्हणाले, हर्षदा रेडकर यांच्या प्रकरणाशी माझा काहीही संबंध नाही. हर्षदा रेडकर यांचे प्रकरण २००८चे आहे. त्यावेळी मी एनसीबीच्या सेवेतही नव्हतो. तसेच २०१७मध्ये माझे क्रांती रेडकर यांच्यासोबत लग्न झाले. त्यामुळे या प्रकरणासोबत माझा संबंध कसा असू शकतो? अशी प्रतिक्रिया समीर वानखेडे यांनी दिली आहे.