राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांतर्गत राजकीय वैचारिक भूमिकेबाबत बरेच मतभेद सुरु आहेत अश्या चर्चा सुरु होत्या. अशातच खा. अभिनेते डॉ.अमोल कोल्हे यांच्या ट्विटमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. हे ट्विट त्यांनी पुस्तक दिनाचे औचित्य साधून केले होते. यावर आता त्यांनी आपली प्रितिक्रिया दिली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे खा. अभिनेते डॉ.अमोल कोल्हे यांनी जागतिक पुस्तक दिनाच्या दिवशी म्हणजेच २३ एप्रिल रोजी एक ट्वीट केले होते. या ट्वीटमध्ये त्यांनी पुस्तक वाचतानाचे दोन फोटो शेअर केले आहेत.त्यासोबत “विचारधारा कोणतीही असो, ती समजून घेण्यासाठी पुस्तकांसारखा चांगला गुरू कोण? वाचाल तर वाचाल! जागतिक पुस्तक दिनाच्या शुभेच्छा!” असे लिहिले होते. त्यामुळे खासदार अमोल कोल्हे भाजपासोबत जाणार असल्याच्या चर्चा रंगू लागल्यात.
ज्या फोटोंवरून अमोल कोल्हेंबाबत चर्चा सुरू झाली आहे, त्या दोनपैकी एका फोटोमध्ये अमोल कोल्हे शरद पवारांचं नेमकेचि बोलणे हे पुस्तक वाचताना दिसत आहेत. तर दुसऱ्या फोटोमध्ये ‘द न्यू बीजेपी’ हे पुस्तक ते वाचत आहेत. त्यांच्या हातात भाजपाचं पुस्तक पाहून अनेक तर्क-वितर्क लढवले जात असतानाच खुद्द अमोल कोल्हेंनीच त्यावर स्पष्टीकरण दिलं आहे. एका कार्यक्रमात ते म्हणाले, बऱ्याच जणांना प्रश्न पडलाय कि नक्की अमोल कोल्हेंना सुचवायचंय काय? तर मला फक्त एवढंच सुचवायचं होतं की विचारधारा कोणतीही असली,आणि तिचा विरोध जरी करायचा असला तरी तिचा आधी अभ्यास करावा लागतो,जे सर्वात जास्त महत्वाचं असतं. जे की तुमच्या वाचनातून येतं”, असं अमोल कोल्हे म्हणाले.