महाराष्ट्रासह पाच राज्यात प्रसिद्ध असणारी व लाखो भाविकांचे दैवत श्रीविठ्ठल बिरदेवाच्या यात्रेला आजपासून सुरुवात झाली. कोल्हापुरातील पट्टणकोडोली गावात लाखो भाविकांनी हजेरी लावलेली आहे. विठ्ठल बिरदेवाच्या नावानं आणि भंडाऱ्याची उधळण करत भाविक या यात्रेत तल्लीन झाले.
या यात्रेस सकाळपासूनच सुरवात झाल्याने ढोलवादनाने परिसर दणाणून गेला. भंडारा, खारका, खोबरे, लोकर यांच्या उधळणीने गावात भक्तीमय वातावरण निर्माण झाले आहे. भाविक मानाच्या छत्र्या फरांडे बाबाच्या हेडाम नृत्यांच्या जागी फिरवतात.
दरवर्षी या यात्रेसाठी जमलेले भाविक भक्ती भावाने भंडाऱ्याची उधळण करतात. यावेळी सुमारे २० टन भंडारा, खारिक, खोबरे व लोकरीची प्रचंड उधळण करण्यात येते. त्यामुळे हा संपूर्ण परिसर सोनेरी दिसतो.