अंबाबाई आणि जोतिबा मंदिरात ड्रेस कोड लागू; भाविकांसाठी नविन नियमावली

श्री अंबाबाई आणि जोतिबा मंदिरात भाविकांसाठी ड्रेस कोड लागू; पारंपरिक वेशभूषेची शिफारस.

अंबाबाई आणि जोतिबा मंदिरात ड्रेस कोड लागू; भाविकांसाठी नविन नियमावली

कोल्हापूर: पश्चिम महाराष्ट्रातील श्रद्धास्थान असलेल्या श्री अंबाबाई (महाळक्ष्मी) मंदिर आणि जोतिबा मंदिरात आता भाविकांसाठी ड्रेस कोड लागू करण्यात आला आहे. देवस्थान व्यवस्थापन समिती, पश्चिम महाराष्ट्र, कोल्हापूर यांच्या वतीने हा निर्णय घेण्यात आला असून, मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांनी पारंपरिक आणि सभ्य वेशभूषा परिधान करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

अलीकडच्या काळात काही भाविक आधुनिक आणि तोकड्या कपड्यांमध्ये मंदिर परिसरात येत असल्याचे दिसून आले होते. त्यामुळे मंदिरातील भक्तीमय वातावरणावर परिणाम होतोय, अशी तक्रार अनेक भक्तांनी आणि स्थानिक नागरिकांनी केली होती. यावर तोडगा म्हणून मंदिर समितीने हा निर्णय घेतला आहे.

या नव्या ड्रेस कोडनुसार, महिला भक्तांनी साडी, सलवार-कुर्ता, चूडीदार यासारख्या पारंपरिक वेशभूषेत दर्शनासाठी यावे. पुरुषांनी धोतर, पायजमा-कुर्ता किंवा सभ्य पँट-शर्ट परिधान करावा. टोकाच्या फॅशन ट्रेंडनुसार परिधान केलेले उघडे किंवा शरीराचे प्रदर्शन करणारे कपडे आता मंदिर परिसरात निषिद्ध असतील.

हेही वाचा: Maharashtra Board SSC Result 2025: राज्यात दहावीचा निकाल जाहीर; पुन्हा एकदा मुलींनी मारली बाजी.. संपूर्ण महाराष्ट्रात कोकण विभाग ठरला अव्वल

कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात दररोज हजारो भाविक दर्शनासाठी येतात. तसेच जोतिबा मंदिरही वार्षिक यात्रेपासून ते दररोजच्या दर्शनासाठी भाविकांच्या गर्दीने फुललेले असते. या दोन्ही मंदिरांचे धार्मिक महत्त्व लक्षात घेता, भक्तांनी स्वतःहून संस्कृतीशी सुसंगत कपड्यांची निवड करावी, असे आवाहन देवस्थान समितीने केले आहे.

या निर्णयाचे अनेक भाविक आणि स्थानिकांनी स्वागत केले आहे. “मंदिर हे श्रद्धेचे स्थान आहे. इथे शालीनता आवश्यक आहे. ड्रेस कोडमुळे भक्तीभाव अधिक वाढेल,” असे मत अनेक भक्तांनी व्यक्त केले.

देवस्थान समितीच्या या निर्णयाची अंमलबजावणी लवकरच सुरू होणार असून, मंदिर प्रवेशद्वारांवर सूचना फलक लावण्यात येणार आहेत. मंदिर सुरक्षा रक्षकांना विशेष सूचना देण्यात आल्या असून, ड्रेस कोडचे पालन न करणाऱ्यांना विनंतीपूर्वक परत पाठवले जाईल.

धार्मिक स्थळांचे पावित्र्य राखण्यासाठी असे नियम आवश्यक असल्याचे धार्मिक विद्वानही मानतात. अंबाबाई आणि जोतिबा मंदिराचे हे पाऊल इतर धार्मिक स्थळांसाठीही आदर्श ठरेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number