जय महाराष्ट्र न्यूज, कोल्हापूर
धनगर समाजाला मार्चपर्यंत आरक्षण न मिळाल्यास मुख्यमंत्री आणि पालक मंत्र्यांच्या घरासमोर ढोल आंदोलन करणार असल्याचा इशारा धनगर समाजाने दिलाय. रविवारी कोल्हापुरातील गांधी मैदानातून धनगर समाज क्रांतिकारी संघाच्या वतीनं रॅली काढण्यात आली. या रॅलीत जिल्ह्यातल्या वाडी-वस्तीवरील धनगर बांधवांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली.
पारंपरिक वाद्य आणि येळकोट येळकोट जय मल्हारच्या जयघोषाने परिसर दणाणून गेला. यावेळी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. धनगर समाजाला एसटी प्रवर्गात समाविष्ट करा, 1982 च्या मंडल आयोगाच्या शिफारसी लागू करा या आणि अशा विविध मागण्या रॅलीतून करण्यात आल्या. धनगर समाज गेली कित्येक वर्षे या मागण्यांसाठी आंदोलन करत आहे. मात्र, सरकार या मागण्या गांभीर्यानं घेत नाही. त्यामुळे यापुढे आंदोलन तीव्र करणार असल्याचा इशारा या रॅलीतून देण्यात आला आहे.