शाळेत शिकणाऱ्या निरागस विद्यार्थ्यांवर कुणी चाकूने वार करण्याची विकृतपणा कुणी करू शकतं का? पण असं घडलंय… एक नव्हे, तर चक्क चौदा मुलांवर चाकूने जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना चीनच्या पश्चिम चोंगकिंग शहरात घडली आहे. या लहानग्यांवर एका मध्यमवयीन महिलेने हल्ला केला.
मिळालेल्या माहितीनुसार या महिलेचं नाव ‘लियू’ असून ती 39 वर्षांची आहे. शाळेतल्याच स्वयंपाकघरातील चाकूने तिने शाळेतील चिमुरड्यांवर हल्ला केला. या महिला हल्लेखोराला अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सकाळी 9.30 च्या सुमारास ही घटना घडली. त्यानंतर सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला. त्या व्हिडिओमध्ये असं आढळून आलं की, पोलीस या महिलेला ओढत शाळेच्या गेटबाहेर आणत आहेत. त्याचबरोबर एका मुलाला देखील जखमी अवस्थेत बाहेर आणलं जातंय.
का केला या महिलेने हल्ला?
याच व्हिडिओमध्ये असंही दिसतंय की महिला आपल्या पतीसोबत भांडत आहे आणि ती त्यामध्ये समाजाचा बदला घेण्याबद्दल बोलत होती.
सरकारविरोधातील रागातून तिने शाळेतील मुलांवर हल्ला केल्याचं बोललं जातंय. मात्र या हल्ल्यामागील नेमकं कारण अद्याप अस्पष्ट आहे.
या घटनेमुळे पालकांमध्ये घबराट पसरली आहे. जखमी मुलांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलंय, तर महिलेला आता अटक करण्यात आलेलं आहे.