जनसेवा विकास आघाडीचे संस्थापक अध्यक्ष किशोर आवारे यांचे निधन झाले आहे. किशोर आवारे यांच्यावर शुक्रवारी रोजी तळेगाव नगरपरिषदेच्या कार्यालयासमोर प्राणघातक हल्ला झाला. हल्ल्यानंतर आवारे यांना सोमाटणे फाटा येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे.
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, किशोर आवारे हे तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांची भेट घेऊन खाली आले होते. त्यावेळी दबा धरून बसलेल्या चार जणांनी त्यांच्यावर प्राणघातक हल्ला केला. त्यापैकी दोघांनी आवारे यांच्यावर गोळीबार केला. तर दोन जणांनी त्यांच्यावर कोयत्याने वार केले. हल्ला केल्यानंतर हल्लेखोर त्याच ठिकाणी काही वेळ थांबून होते. किशोर आवारे हे रक्ताच्या थारोळ्यात पडल्यानंतरही हल्लेखोर काहीवेळ तिथेच थांबून होते. त्यानंतर जखमी अवस्थेत आवारे यांना सोमाटणे फाटा येथील खासगी रुग्णालयात दाखल केले. त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान, या घटनेमुळे तळेगाव दाभाडे परिसरात खळबळ उडाली असून पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
मागील दहा वर्षांपासून किशोर आवारे हे स्थानिक राजकारणात सक्रिय होते. त्यांनी त्यांच्या जनसेवा विकास समितीच्या माध्यमातून अनेक उपक्रम राबवले होते. तसेच, किशोर आवारे यांना पुण्यातील महाराष्ट्र साहित्य कला प्रसारिणी सभा यांच्यावतीने डॉ. निर्मलकुमार फडकुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त देण्यात येणारा समाजभूषण पुरस्कार जाहीर करण्यात आला होता. तसेच कोरोना आणि पूरग्रस्त परिस्थितीत आवारे यांनी स्वचर्चातून मदतकार्य केले होते.