‘विक्रांत वाचवा’ निधीप्रकरणी भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या अडचणीत वाढ झाली असून विशेष न्यायालयाने त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला आहे. त्यामुळे त्यांच्यावर अटकेची टांगती तलवार कायम आहे. तसेच पुत्र नील सोमय्याच्या जामीन अर्जावर उद्या सुनावणी होणार आहे.
किरीट सोमय्या यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर मुंबई सत्र न्यायालयात सुनावणी पार पडली असून न्यायालयाने सोमय्यांचा जामीन अर्ज फेटाळला आहे. तसेच याप्रकरणाचा पुढील तपास आर्थिक गुन्हा शाखा करणार आहे.
काही दिवसांपूर्वी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी किरीट सोमय्यांवर आयएनएस विक्रात युद्धनौकेच्या घोटाळ्याप्रकरणी आरोप केले आहेत. याप्रकरणी किरीट सोमय्या आणि पुत्र नील सोमय्या यांच्या विरोधात ट्रॉम्बे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून त्यांना चौकशीसाठी समन्स बजावले होते. मात्र, सोमय्या पिता-पुत्र चौकशीसाठी गैरहजर राहिले. तसेच त्यांनी न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केला होता. यावर सुनावणी पार पडली असून न्यायालयाने किरीट सोमय्यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला असून पुत्र नील सोमय्याच्या जामिनावर उद्या सुनावणी होणार आहे.
शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजप नेता किरीट सोमय्या यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. विक्रांत युद्धनौकेच्या नावावर ५८ कोटी रुपयांची रक्कम लाटली असल्याचा आरोप संजय राऊतांनी केला आहे. संजय राऊतांनी आरोप केला की, भाजप नेते किरीट सोमय्या यांनी २०१४ साली विक्रांत युद्धनौका वाचवण्यासाठी पैसे गोळा करण्याची मोहीम सुरू केली होती. या मोहिमेत ५७ ते ५८ कोटी रुपयांची रक्कम झाली होती. पण ही रक्कम राज्यपाल कार्यालयात पोहचले नसल्याचे समोर आले आहे. सोमय्यांनी विक्रांत युद्धनौकेच्या नावावर लाटलेली रक्कम २०१४च्या निवडणूकीसाठी आणि त्यांच्या निकॉन इन्फ्रा कंपनीत वळवला आहे. हा घोटाळा म्हणजे किरीट सोमय्यांनी देशाच्या संरक्षण व्यवस्थेशी, राष्ट्रीय भावनेशी केलेली प्रतरणा आहे.