छत्तीसगडमधील महासमुंद जिल्ह्यातून एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. खल्लारी गावातील खल्लारी माता मंदिरात दर्शनासाठी गेलेल्या भाविकांसोबत भीषण अपघात घडला आहे. मंदिर परिसरातील रोपवेची ट्रॉली तुटल्याने झालेल्या अपघातात एका महिला भाविकाचा मृत्यू झाला असून सात जण जखमी झाले आहेत. घटनेनंतर तातडीने बचावकार्य सुरू करण्यात आले आहे.
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आज रविवारी सकाळी सुमारे 10 वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला. मंदिराच्या डोंगरावरून खाली उतरत असताना रोपवेच्या ट्रॉलीची तार अचानक तुटली. त्या वेळी ट्रॉलीमध्ये एकूण आठ जण प्रवास करत होते. तार तुटल्यामुळे ट्रॉली खाली कोसळली आणि हा गंभीर अपघात घडला.
या अपघातात रायपूर येथील 28 वर्षीय आयुषी सातकार या महिला भाविकाचा मृत्यू झाला. तर इतर सात जण जखमी झाले असून त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सर्व जखमींवर सध्या उपचार सुरू असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नवरात्र उत्सवानिमित्त अनेक भाविक बागबाहरा परिसरातील खल्लारी गावात असलेल्या खल्लारी माता मंदिरात दर्शनासाठी आले होते. त्याच वेळी काही भाविक रोपवेच्या माध्यमातून मंदिराच्या पायथ्याकडे उतरत असताना ही दुर्घटना घडली.
दरम्यान, या दुर्घटनेवर छत्तीसगडचे मुख्यमंत्री विष्णु देव साय यांनी तीव्र दु:ख व्यक्त केले आहे. त्यांनी प्रतिक्रिया देताना या घटनेला अत्यंत दु:खद आणि वेदनादायक असे संबोधले. अपघातात मृत्यू झालेल्या भाविकाच्या कुटुंबीयांप्रती त्यांनी संवेदना व्यक्त केल्या तसेच जखमींना तातडीने सर्वोत्तम उपचार मिळावेत, असे निर्देश अधिकाऱ्यांना दिले आहेत.
मुख्यमंत्री विष्णु देव साय यांनी या अपघाताची सखोल चौकशी करण्याचेही आदेश दिले असून दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल, असे स्पष्ट केले आहे. तसेच जखमी भाविकांनी लवकरात लवकर बरे व्हावे, अशी भावनाही त्यांनी व्यक्त केली आहे.