महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातातील निधनाची घटना अजूनही ताजी असतानाच आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे.
उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांच्या हेलिकॉप्टरमध्ये उड्डाणादरम्यान अचानक तांत्रिक बिघाड झाल्यामुळे त्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला. सुदैवाने वैमानिकांच्या तत्परतेमुळे हेलिकॉप्टरची लखनौ विमानतळावर सुरक्षित आपत्कालीन लँडिंग करण्यात आली आणि मोठा अनर्थ टळला. डिस्प्ले प्रणालीमध्ये अडथळा निर्माण झाल्यानंतर काही क्षणांतच केबिनमध्ये धूर पसरू लागल्याने परिस्थिती धोकादायक बनली. सुरक्षिततेचा विचार करून वैमानिकांनी तातडीने लखनौ विमानतळावर हेलिकॉप्टर उतरवण्याचा निर्णय घेतला.
मिळालेल्या माहितीनुसार, केशव प्रसाद मौर्य लखनौहून कौशांबीकडे हेलिकॉप्टरने रवाना झाले होते. उड्डाण सुरू झाल्यानंतर काही वेळातच यंत्रणेत बिघाड झाल्याचे वैमानिकांच्या लक्षात आले. यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून विमानतळाशी संपर्क साधून आपत्कालीन लँडिंगची प्रक्रिया सुरू करण्यात आली. हेलिकॉप्टर जमिनीवर उतरताना केबिनमध्ये धूर भरल्याचेही सांगितले जात आहे.
सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. उपमुख्यमंत्री मौर्य यांच्यासह हेलिकॉप्टरमध्ये उपस्थित असलेले सर्व सुरक्षा कर्मचारी सुरक्षित असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. घटनेची माहिती मिळताच विमानतळ प्रशासन, सुरक्षा यंत्रणा आणि तांत्रिक पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले आणि उपमुख्यमंत्र्यांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले.
हेलिकॉप्टरमध्ये आलेल्या बिघाडामुळे मौर्य यांनी पुढील प्रवास रस्तेमार्गे करण्याचा निर्णय घेतला. ते नियोजित कार्यक्रमासाठी कौशांबीकडे रवाना झाले असून तेथे आयोजित दोन दिवसीय ‘सरस महोत्सव’ कार्यक्रमाचे उद्घाटन करण्याचे त्यांचे वेळापत्रक आहे. कौशांबी जिल्ह्यातील सयारा येथील बाबू सिंह डिग्री कॉलेज मैदानावर हा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. ग्रामीण आजीविका मजबूत करणे आणि महिला सक्षमीकरणाला चालना देणे हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश आहे.
दरम्यान, आपत्कालीन लँडिंगनंतर हेलिकॉप्टरची सखोल तांत्रिक तपासणी सुरू करण्यात आली आहे. तज्ज्ञ पथक बिघाडाचे नेमके कारण शोधण्याचा प्रयत्न करत असून सर्व यंत्रणांची तपासणी केली जात आहे. प्राथमिक तपासानंतरच या घटनेमागील तांत्रिक कारण स्पष्ट होईल, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.