दिल्लीतील अधिकाऱ्यांच्या बदली पोस्टिंगबाबत केंद्र सरकारने जारी केलेल्या अध्यादेशाविरोधात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सुरू केलेल्या मोहिमेला महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पाठिंबा दिला आहे. केजरीवाल यांच्यासोबत मातोश्री निवासस्थानी झालेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत ठाकरेंनी भाजपवर जोरदार हल्ला चढवला. ठाकरे कुटुंब आणि मातोश्री नाते जपण्यासाठी प्रसिद्ध आहेत. काही लोक फक्त राजकारण करतात, पण आम्ही राजकारणाच्या पलीकडे जाऊन नाती जपतो, या शब्दांत केजरीवाल यांनी भाजपवर ताशेरे ओढले. गेल्या दोन महिन्यांत केजरीवाल दुसऱ्यांदा मातोश्रीवर दाखल झाले होते.
केंद्राच्या या वटहुकूमाचे कायद्यात रूपांतर करण्यासाठी सहा महिन्यांच्या आत त्यासंबंधीच्या विधेयकाला संसदेची मंजुरी आवश्यक आहे. त्यामुळे याबाबत पुढील लढाई राज्यसभेमध्ये होण्याची शक्यता आहे. हेच लक्षात घेऊन दिल्ली सरकारच्या अधिकारांबाबत केंद्र सरकारने काढलेल्या अध्यादेशाविरोधात केजरीवाल विरोधी पक्षांच्या भेटीगाठी घेऊन त्यांचा पाठिंबा मागत आहेत. राज्यसभेत भाजपचं बहुमत नसल्याने हा वटहुकूम मंजूर करण्यात भाजपला अडचणी येऊ शकतात. तत्पूर्वीच केजरीवाल यांनी विरोधी पक्षांची आघाडी उघडत भाजपविरोधी पक्षांना साद घातलीये.
आता केजरीवाल यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर शरद पवार यांची भेट घेणार आहे. या भेटीमध्ये नक्की काय पुढील सूत्र ठरतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. पंजाबचे मुुख्यमंत्री भगवंत मान देखील त्यांच्यासोबत असतील.