मुंबई: आयपीएल 2026 च्या रणधुमाळीत शनिवारी चेन्नई सुपर किंग्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात रंगलेल्या हाय-व्होल्टेज सामन्यात एका 20 वर्षांच्या तरुणाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. चेन्नईचा युवा फलंदाज कार्तिक शर्माने मुंबईच्या गोलंदाजांचा समाचार घेत 54 धावांची झुंजार खेळी साकारली आणि संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. विशेष म्हणजे, त्याने त्याचे अर्धशतक पूर्ण केल्यानंतर ज्या पद्धतीने 'गन सेलिब्रेशन' केले, त्याने चाहत्यांना थेट एमएस धोनीच्या श्रीलंकेविरुद्धच्या 183 धावांच्या ऐतिहासिक खेळीची आठवण करून दिली.
धोनीच्या स्टाईलने जिंकली चाहत्यांची मने
कार्तिक शर्माने 40 चेंडूंमध्ये 3 षटकार आणि 4 चौकारांच्या मदतीसह 54 धावा ठोकल्या. पन्नाशी गाठताच त्याने त्याची बॅट गनसारखी धरून सेलिब्रेशन केले. हे अगदी तसंच होतं, जसं एमएस धोनीने 2005 मध्ये जयपूरच्या मैदानात शतक झळकावल्यानंतर केलं होतं. ड्रेसिंग रूममध्ये धोनीसोबत वेळ घालवणाऱ्या कार्तिकने त्याच्याच समोर हे सेलिब्रेशन करून एका अर्थाने त्याच्या गुरुला मानवंदना दिली. या सेलिब्रेशनचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
मैदानावर उतरण्यापूर्वीच होता 'हा' प्लॅन
सामन्यानंतर बोलताना कार्तिकने त्याच्या या खास सेलिब्रेशनमागचे गुपित उघड केले. तो म्हणाला, "हे माझे आयपीएलमधील पहिलेच अर्धशतक आहे. मी आधीच विचार करून ठेवला होता की, जर आज मी धावा करण्यात यशस्वी झालो, तर मी अशाच पद्धतीने आनंद साजरा करेन." पहिल्याच मोठ्या खेळीला संस्मरणीय बनवण्यासाठी कार्तिकने केलेली ही तयारी त्याच्या आत्मविश्वासाची साक्ष देते.
कर्णधार ऋतूराजची मिळाली मोलाची साथ
160 धावांच्या लक्षाचा पाठलाग करताना संजू सॅमसन लवकर बाद झाल्यानंतर चेन्नईचा संघ थोडा दबावाखाली होता. मात्र, कार्तिकने कर्णधार ऋतूराज गायकवाडसोबत मिळून 98 धावांची अभेद्य भागीदारी रचली. ऋतूराजने कार्तिकला केवळ नैसर्गिक खेळ खेळण्याचा सल्ला दिला होता. "ऋतू भैय्याने मला फक्त इतकंच सांगितलं की, काहीही वेगळं किंवा विशेष करण्याचा प्रयत्न करू नकोस, जसा खेळतोस तसाच खेळत राहा," असं कार्तिकने विजयानंतर नमूद केलं.
चेन्नईचा विजयाचा चौकार
या सामन्यात कर्णधार ऋतूराज गायकवाडने नाबाद 67 धावांची खेळी करत संघाला विजयाची ओढून नेले आणि त्याला 'प्लेअर ऑफ द मॅच' पुरस्काराने गौरवण्यात आले. मात्र, विजयाची खरी चमक कार्तिक शर्माच्या फलंदाजीत आणि त्याच्या आत्मविश्वासपूर्ण सेलिब्रेशनमध्ये दिसून आली. धोनीचा वारसा पुढे नेणारा एक आक्रमक फलंदाज चेन्नईला कार्तिकच्या रूपाने मिळाला असल्याची चर्चा आता क्रिकेट वर्तुळात रंगू लागली आहे.
या विजयामुळे चेन्नई सुपर किंग्सचा संघ गुणतालिकेत वरच्या स्थानी पोहोचला असून, युवा खेळाडूंच्या या कामगिरीमुळे चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. आगामी सामन्यांमध्येही कार्तिक शर्माकडून अशाच धडाकेबाज कामगिरीची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.