जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
देशातील 34 हजार कोटींची सर्वात मोठी कर्जमाफी ही महाराष्ट्रात केली गेली. असा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करतात. या कर्जमाफीत शेतकऱ्यांचं दीड लाखांपर्यंतच कर्ज माफ करून त्यांचा सातबारा कोरा करण्यात येणार आहे.
राज्य सरकारनं शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची आकडेवारी जाहीर केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज आपल्या ट्विटरवरून कर्जमाफी होणाऱ्या शेतकऱ्यांची जिल्हानिहाय आकडेवारी जाहीर केली आहे.
या आकडेवारीत बुलडाण्यातील सर्वाधिक शेतकऱ्यांचा 2 लाख 49 हजार 818 शेतकऱ्यांचा समावेश आहे. तर मुंबईतल्या 813 शेतकऱ्यांनाही कर्जमाफी मिळणार आहे. त्यात मुंबई शहरातले 614, तर उपनगरातले 119 शेतकरी आहेत.
मुंबईतल्या शेतकऱ्यांना मिळालेल्या कर्जमाफीनं चर्चांना उधाण आलं. औद्योगिक नगरी म्हणून ओळख असलेल्या मुंबईत खरंच इतके शेतकरी आहेत का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
1.5 लाखापर्यंत कर्ज असलेले आणि सात बारा पूर्णत: कोरा होणाऱ्या एकूण शेतकऱ्यांची संख्या 36,10,216 एवढी असेल. तसेच यामध्ये पुनर्गठन, नियमित कर्जभरणारे तसेच ओटीएसचा लाभ घेणारे शेतकरी समाविष्ट नाहीत अशी सुद्धा माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.