सातारा: घरातून हसतमुखाने बाहेर पडलेली व्यक्ती संध्याकाळी सुखरूप परत येईलच, याची शाश्वती आजकाल राहिलेली नाही. सातारा जिल्ह्यातील कराड शहरासाठी कालचा बुधवारचा दिवस असाच एक ‘काळा वार’ ठरला. अवघ्या तीन तासांच्या अंतराने घडलेल्या अपघातांच्या मालिकेने संपूर्ण कराड आणि मलकापूर शहर हादरून गेले आहे. रस्त्यांवर जणू मृत्यूचे तांडवच पाहायला मिळाले. सलग तीन वेगवेगळ्या अपघातांत तीन निष्पाप जीवांचा बळी गेला आहे, तर चार जण गंभीर जखमी झाले आहेत. एकाच संध्याकाळी घडलेल्या या घटनांमुळे नियतीचा खेळ किती क्रूर असू शकतो, याचा अंगावर काटा आणणारा प्रत्यय सातारकरांना आला.
या अपघाती सत्राची सुरुवात कराड शहरात एका अत्यंत हृदयद्रावक घटनेने झाली. कर्तव्यावर असलेल्या प्राध्यापिका सुषमा किर्दते या त्यांच्या दुचाकीवरून चौकातून जात असताना, काळाने त्यांच्यावर झडप घातली. पाठीमागून आलेल्या एका भरधाव डंपरने त्यांच्या स्कुटीला जोरदार धडक दिली. काही समजण्याच्या आतच त्यांची दुचाकी डंपरखाली चिरडली गेली आणि या भीषण अपघातात उच्चशिक्षित प्राध्यापिका किर्दते यांचा जागीच दुर्दैवी अंत झाला. ही संपूर्ण थरारक घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून, पाहणाऱ्यांच्या काळजाचा ठोका चुकवणारी आहे. पोलिसांनी तातडीने सूत्रे हलवत डंपर चालकाला ताब्यात घेतले आहे.
सातारा: कराडमध्ये अपघाताचा वार, तीन तासात तीन वेगवेगळ्या अपघात तीन ठार pic.twitter.com/hoXvqeFVAy — VIRALबाबा (@viralmedia70) March 25, 2026
ही घटना ताजी असतानाच, मलकापूर येथील कोयना वसाहत परिसरातील भाजी मंडईत ‘हिट अँड रन’चा थरार उडाला. पोटाची खळगी भरण्यासाठी रस्त्यावर भाजी विकणाऱ्या महिलांना मृत्यूने गाठले. स्थानिकांच्या माहितीनुसार, एका महिलेने चालवलेल्या भरधाव कारने आधी एका दुचाकीला उडवले आणि त्यानंतर थेट भाजीविक्रेत्यांना चिरडत कार रस्त्यालगतच्या कठड्यावर जाऊन आदळली.
या भयावह घटनेत उषा बाळू रौंदाळे (वय 47) या कष्टकरी महिलेला जागीच प्राण गमवावे लागले, तर अन्य तीन महिला गंभीर जखमी झाल्या. त्यांच्यावर कृष्णा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. विशेष म्हणजे, या मंडईतील अपघातांचा धोका ओळखून पालिकेकडे वारंवार पाठपुरावा करण्यात आला होता, मात्र प्रशासनाच्या चुकीमुळे अखेर एका गरिबाचा कारण नसताना बळी गेला आहे.
मृत्यूचे हे सत्र एवढ्यावरच थांबले नाही. पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील खोडशी गावाजवळ झालेल्या तिसऱ्या भीषण अपघातात एका ॲपेरिक्षा चालकाला त्यांचे प्राण गमवावे लागले आहेत. तर दुसरीकडे, कराडमधीलच कृष्णा कॅनॉल परिसरात दुचाकीवरून जाणाऱ्या दोघांनाही अपघाताचा फटका बसला असून ते जखमी झाले आहेत.
अवघ्या काही तासांत एकापाठोपाठ एक आलेल्या या आपघातांमुळे रुग्णालये आणि कराड शहर पोलीस ठाण्यात मोठी गर्दी उसळली होती. प्रशासकीय यंत्रणाही या दुर्घटनांच्या साखळीने चक्रावून गेली.
कराड आणि मलकापूर परिसरात घडलेल्या या रक्तपाताने रस्ते सुरक्षेचा आणि प्रशासकीय अनास्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आणला आहे. भरधाव वाहनांचा वेग आणि व्यवस्थेचे दुर्लक्ष यामुळे सामान्य नागरिकांच्या जिवाशी चाललेला हा खेळ कधी थांबणार, हाच खरा उद्विग्न करणारा प्रश्न आहे. मृतांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून, संपूर्ण शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे. ‘पुढच्यास ठेच, मागचा शहाणा’ या उक्तीप्रमाणे आता तरी प्रशासनाने जागे होऊन कठोर पावले उचलणे ही काळाची गरज बनली आहे.