Kidney Scam Crime: अमिताभ बच्चन यांचं उदाहरण देऊन गरिबांना जाळ्यात ओढायचा; आंतरराज्य किडनी रॅकेटचा पर्दाफाश, सहा बड्या डॉक्टरांना बेड्या ठोकल्या

गरीबांना आमिष दाखवून अवयव तस्करी केली जात होती. नेपाळ ते एनसीआरपर्यंत पसरलेल्या या जाळ्यामुळे वैद्यकीय क्षेत्रावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

Kidney Scam Crime: अमिताभ बच्चन यांचं उदाहरण देऊन गरिबांना जाळ्यात ओढायचा; आंतरराज्य किडनी रॅकेटचा पर्दाफाश, सहा बड्या डॉक्टरांना बेड्या ठोकल्या

उत्तर प्रदेशातील कानपूर येथून वैद्यकीय क्षेत्राला काळिमा फासणारा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कानपूर पोलिसांनी एका संघटित किडनी ट्रान्सप्लांट रॅकेटचा भंडाफोड केला असून, या जाळ्याचे धागेदोरे नेपाळ पासून पश्चिम बंगाल आणि एनसीआरपर्यंत पसरलेले असल्याचे उघड झाले आहे. गरीब आणि गरजू लोकांना पैशांचे आमिष दाखवून त्यांचे मूत्रपिंड काढून ते श्रीमंत रुग्णांना कोट्यवधी रुपयांत विकले जात होते.

या प्रकरणात पोलिसांनी सहा डॉक्टरांना अटक केली असून, हेच या संपूर्ण रॅकेटचे मुख्य आधारस्तंभ असल्याचे समोर आले आहे. डॉ. प्रीती आहुजा, ज्या आहुजा नर्सिंग होमच्या मुख्य आहेत, त्यांचे नाव सर्वाधिक धक्कादायक ठरले आहे. त्यांच्यासोबत त्यांचे पती डॉ. सुरजीत आहुजा यांचाही सहभाग उघड झाला आहे. याशिवाय डॉ. राजेश कुमार, डॉ. नरेंद्र सिंह, डॉ. रामप्रकाश कुशवाहा आणि डॉ. कुलदीप यांनाही अटक करण्यात आली आहे. या डॉक्टरांनी वैद्यकीय नैतिकतेला तिलांजली देत रुग्णालयांचे रूपांतर ‘किडनी बाजारात’ केल्याचा आरोप आहे.

या संपूर्ण जाळ्याचा सूत्रधार मात्र एखादा उच्चशिक्षित व्यक्ती नसून, आठवीपर्यंत शिक्षण घेतलेला ॲम्ब्युलन्स चालक शिवम अग्रवाल असल्याचे समोर आले आहे. शिवम हा डायलिसिस घेत असलेल्या श्रीमंत रुग्णांना किडनी मिळवून देण्याचे आमिष दाखवत असे. तो टेलिग्राम आणि व्हॉट्सॲपच्या माध्यमातून आर्थिक अडचणीत असलेल्या लोकांचा शोध घेत असे आणि त्यांना भावनिकरीत्या तयार करत असे. यासाठी तो अमिताभ बच्चन यांचे उदाहरण देत, “एकाच किडनीवर ते निरोगी आयुष्य जगू शकतात, तर तुम्ही का नाही?” असे सांगून लोकांना जाळ्यात ओढत असे.

हेही वाचा: Asha Bhosale Death : आशाताईंना या गाण्यासाठी मिळाला फिल्मफेअर पुरस्कार, मात्र हे गाणं चित्रपटात कधी घेतलच नाही; काय आहे किस्सा? जाणून घ्या

तपासात आणखी एक धक्कादायक बाब समोर आली आहे. या रॅकेटमधील मुख्य हा नोएडा येथील डॉ. रोहित असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. तो त्याच्या टीमसह चार्टर्ड विमानाने किंवा फ्लाइटने लखनौ येथे येत असे आणि तेथून कारने कानपूरमध्ये पोहोचत असे. ऑपरेशनच्या रात्री रुग्णालयातील सर्व स्थानिक कर्मचाऱ्यांना सुट्टी दिली जात असे, तसेच सीसीटीव्ही कॅमेरे ‘मेंटेनन्स’च्या नावाखाली बंद ठेवले जात. रात्रीच्या अंधारात बेकायदेशीर प्रत्यारोपण करून पहाटेपूर्वी ही टीम शहर सोडत असे.

या अवैध धंद्यात कोट्यवधी रुपयांची उलाढाल होत असल्याचे उघड झाले आहे. पोलिस आयुक्त रघुवीर लाल यांच्या माहितीनुसार, एका किडनी ट्रान्सप्लांटसाठी 60 लाख ते 1 कोटी रुपयांपर्यंत व्यवहार होत होता. मात्र, किडनी देणाऱ्या गरीब व्यक्तीला फक्त आठ ते 10 लाख रुपये दिले जात होते, तर उर्वरित रक्कम डॉक्टर, दलाल आणि रुग्णालय मालकांमध्ये वाटली जात होती.

या प्रक्रियेदरम्यान गंभीर गुन्हे आणि जीवितहानीच्या घटनाही घडल्या असून, एका महिलेचा रुग्णालयात मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.प्रशासनाच्या निष्काळजीपणाचाही या प्रकरणात मोठा वाटा असल्याचे दिसून आले आहे. 2025 मध्ये काही संकेत मिळूनही ठोस कारवाई झाली नव्हती. आता मात्र पोलिसांनी संबंधित रुग्णालय सील केले असून फरार आरोपींमध्ये डॉ. मुदस्सिर अली, डॉ. अफजल, नवीन पांडे आणि वैभव मुद्गल यांचा समावेश आहे. या सर्वांवर 25,000 रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे.

पोलिस तपासानुसार या रॅकेटचे जाळे कानपूर, लखनौ, मेरठ, अलीगड, नोएडा, उत्तराखंड, पश्चिम बंगाल आणि नेपाळपर्यंत पसरलेले आहे. आता पोलिसांनी या संपूर्ण नेटवर्कचा ‘गँग चार्ट’ तयार करून संबंधित आरोपींची मालमत्ता जप्त करण्याची आणि त्यांना कठोर शिक्षा मिळवून देण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. हा प्रकार केवळ कायद्याचा भंग नसून, मानवतेलाच काळिमा फासणारा असल्याची तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे. 

हेही वाचा: LPG Gas Tanker: जगाचा श्वास रोखणाऱ्या मार्गावरून 'जग विक्रम' यशस्वीरित्या मार्गस्थ; 20 हजार टन गॅस घेऊन भारतीय जहाज ओमानच्या आखातात; ऊर्जा सुरक्षेला मोठं यश

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number