विजय चिडे, प्रतिनिधी,
छत्रपती संभाजीनगर : जालना रोडवरील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये 6 महिन्यांपासून बनावट कागदपत्रांसह मुक्काम ठोकणाऱ्या 45 वर्षीय कल्पना भागवत (रा. चिनार गार्डन, पडेगाव) या महिलेच्या घराची सोमवारी सिडको पोलिसांनी झाडाझडती घेतली. चौकशीत ती सातत्याने उडवाउडवीची उत्तरे देत असल्याचे आढळले. चौकशीदरम्यान कल्पनाने अचानक, “माझ्यासाठी अॅड. उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करा,” असे म्हटल्याने क्षणभर पोलिसही अचंबित झाले. सध्या एटीएसकडून तिची स्वतंत्र चौकशी सुरू आहे.
शनिवारी बंदोबस्तादरम्यान या संशयास्पद महिलेची माहिती पोलिस निरीक्षक अतुल येरमे यांना मिळाली. महिला अधिकाऱ्यांच्या मदतीने करण्यात आलेल्या चौकशीत कल्पना गेल्या 6 महिन्यांपासून हॉटेलमध्ये राहत असल्याचे समोर आले. हॉटेल व्यवस्थापनाला दिलेल्या तिच्या आधार कार्डमध्ये गंभीर त्रुटी असल्याचेही उघड झाले. तिच्या बॅगमध्ये UPSC 2017 सालचे पाच पानांचे बनावट नियुक्तिपत्र आढळले, ज्यात क्रमांक 333 वर तिचे नाव असल्याचा उल्लेख होता. तपासात ही संपूर्ण यादी बनावट असल्याचे स्पष्ट झाले.
न्यायालयाने तिची 26 नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी मंजूर केली असून कसून चौकशी सुरू आहे. चौकशीत कल्पनाने सांगितले की ती डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात काही वर्षे तासिका तत्त्वावर काम करत होती. एमए उत्तीर्ण असलेल्या कल्पना अविवाहित आहे. तिचे वडील सेवानिवृत्त शिक्षक असून त्यांचे पेन्शन आईमार्फत तिच्याकडे येत असल्याचेही तिने सांगितले. तिची आईही काही काळ तिच्यासोबत हॉटेलमध्ये राहत होती. विशेष म्हणजे, मागील 5 महिन्यांत कल्पनाने पंचतारांकित हॉटेलमध्ये तब्बल 5 ते 6 लाख रुपये खर्च केल्याचे समोर आले आहे.
या खर्चाचे स्रोत स्पष्ट न झाल्यामुळे पोलिसांच्या शंका अधिक गडद झाल्या आहेत. पोलिसांनी तिच्या शिक्षण, प्रवास नोंदी, बँक व्यवहार, आणि इतर संबंधित माहिती मागवण्यासाठी ठिकठिकाणी पत्रव्यवहार केला आहे, अशी माहिती पोलिस निरीक्षक अतुल येरमे यांनी दिली. या संपूर्ण प्रकरणामुळे शहरात मोठी खळबळ उडाली आहे आणि पुढील तपासात नवे धागेदोरे समोर येण्याची अपेक्षा आहे.