बॉलिवूडमध्ये सिक्स पॅक ऍब्स, तगडी शरीरयष्टी अशी हिरोंची व्याख्या दृढ झाली आहे. मात्र दक्षिणेकडील चित्रपटांत अजूनही हिरो हा फिटनेस फ्रिक असवा, अशी जबरदस्ती नसते. मात्र तरीही तेथील फॅन्स आपल्या आवडत्या अभिनेत्यांसाठी वेडे असतात. महेश बाबू, अल्लू अर्जून यांसारख्या स्टार्ससाठी प्रचंड क्रेझी असलेले तेलुगू फॅन्स ज्युनियर एनटीआर या स्टारला डोक्यावर घेत असले, तरी त्याच्या गोल गरगरीत देहयष्टीवरून त्याची हेटाळणी करत. मात्र नव्या ‘अरविंदा समेता’ या तेलुगू चित्रपटात त्याच्या लूक्सने मात्र हैराण झालेत.
ज्यु. एनटीआर हा दिवंगत सुपरस्टार, ‘तेलुगू देसम पार्टी’चे संस्थापक आणि माजी मुख्यमंत्री एनटीआर यांचा नातू. त्यामुळे सिनेमात काम मिळणं त्याच्यासाठी अवघड नव्हतं. ‘तारक’ असं मूळ नाव असलेल्या ज्यु. एनटीआरला आजोबांसारखाच चेहरामोहरा लाभल्याने प्रेक्षकांनी त्याला डोक्यावर घेतलं. त्यातून त्याचं कुचिपुडी नृत्यात असलेलं प्राविण्य यांमुळे तारक लोकांचा लाडका अभिनेता बनला. त्याच्या बहुतेक चित्रपटांनी तेलुगूमध्ये 100 कोटींचा पल्ला गाठला. मात्र त्याचवेळी त्याचं वाढतं वजन हा टीकेचा विषय बनू लागला. त्याचा परिणाम त्याच्या डान्सवरही होऊ लगला. हे लक्षात येताच ‘टेम्पर’, ‘नानाकू प्रेमंतो’, ‘जनता गॅरेज’ अशा सिनेमांत त्याचा फिटनेस दिसू लागला. मात्र पुन्हा ‘जय लव कुस’ या सिनेमांत तो पुन्हा जाडा दिसू लागला.

यानंतर ज्यु. एनटीआरने आपल्या फिटनेसवर लक्ष द्यायला सुरूवात केली आणि त्याचा परिणाम नुकत्याच रिलीज झालेल्या ‘अरविंदा समेता’ चित्रपटातील त्याच्या लूक्समध्ये दिसून आला. या देमारपटात ज्यु. एनटीआर याच्या फिजिकने सलमानलाही आव्हान दिलंय. ‘अरविंदा समेता’ या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर आठवडाभराच्या आतच 100 कोटींची कमाई केली आहे.