महाराष्ट्रात सध्या FDA च्या धडक कारवायांमुळे हॉटेल्सधारक, खाद्यपदार्थांनी दुकानं, दूध डेअरी संचालकांची चांगलीच भंबेरी उडाली आहे. FDA कडून गेल्या काही दिवसांत भेसळयुक्त अन्नपदार्थांचे अनेक रॅकेट्स उध्वस्त करण्यात आलेत. अशातच मुंबईतील जे. जे. महानगर सरकारी रक्तपेढीत जून 2026 मध्ये समोर आलेल्या रक्तचोरी आणि आर्थिक गैरव्यवहाराप्रकरणी अन्न व औषध प्रशासनाने (FDA) या रक्तपेढीचा परवाना रद्द केला.
या तपासणीत औषधे व सौंदर्य प्रसाधने अधिनियमांचे सर्रास उल्लंघन झाल्याचं समोर आलं होतं. अनियमितता आणि नियमभंगाच्या गंभीर कारणांमुळे ही कारवाई करण्यात आली. यानंतर आता या प्रकरणात नवा ट्वीस्ट समोर आला आहे. या संपूर्ण प्रकरणात बदलापूर येथील 'माया ब्लड सेंटर'चं कनेक्शन समोर आलं होतं. तपासणीत 50 रक्तपिशव्या बदलापूर येथील माया ब्लड सेंटर येथे पाठविण्यात आल्याचे समोर आलं होतं. त्यानंतर आता बदलापुरातील माया ब्लड बँकेचा परवाना कायमचा रद्द करण्यात आला आहे.
दरम्यान यासंबंधीत एफडीएने जे. जे. रक्तपेढीला कारणे दाखवा नोटीस बजावून 15 दिवसांची मुदत दिली होती. तसेच औषधे व सौंदर्य प्रसाधने अधिनियम, 1940 तसेच औषधे व सौंदर्य प्रसाधने नियम, 1945 अंतर्गत रक्तसंकलन, तपासणी, साठवण, गुणवत्ता नियंत्रण आणि अभिलेख व्यवस्थापनासंबंधीच्या बंधनकारक नियमांचे उल्लंघन झाल्याचे तपासात स्पष्ट झाले होते. त्यामुळे सार्वजनिक आरोग्याचा विचार करता हा परवाना कायमचा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला असून ब्लड बँकेला टाळे लागले आहे. या कारवाईमुळे आता बदलापूरमधील 'माया ब्लड सेंटर' ला झालेल्या या रक्तपुरवठ्याची आणि एकूणच या रॅकेटची सखोल चौकशी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.