जय महाराष्ट्र न्यूज, बीड
बीड जिल्ह्यात महाराष्ट्रातला सर्वात मोठा जलयुक्त शिवार घोटाळा झाला असल्याचा अहवाल कृषी आयुक्तांना सादर करण्यात आला होता. 2015-2016 या आर्थिक वर्षात जलयुक्त शिवार या कामामध्ये भ्रष्टाचार झाल्याप्रकरणी 24 कर्मचाऱ्यांवर फसवणुकीचा गुन्हा शुक्रवारी दाखल झाला.
पंकजा मुंडे यांच्या बीड जिल्ह्यात जलयुक्त शिवार घोटाळ्याप्रकरणी चोवीस अधिकाऱ्यांविरोधात फसवणुकीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. परळी पोलिस स्टेशनमध्ये हे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
या प्रकरणाची तक्रार झाल्यानंतर यापूर्वीच 18 कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलं होतं. आता एकूण 24 कर्मचाऱ्यांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.
एकूण दोन कोटी 47 हजार 672 रुपयांचा हा अपहार असल्याचं उघड झालं. या प्रकरणी दोषींवर कारवाई करण्याची मागणी काँग्रेस नेते वसंत मुंडे यांनी लावून धरली होती. कृषी आयुक्त कार्यालयाच्या अहवालानुसार परळी तालुक्याचे कृषी अधिकारी भीमराव बांगर यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यानंतर अपहार आणि फसवणुकीचे गुन्हे दाखल झाले आहेत.