जालना जिल्ह्यातून एक अत्यंत संतापजनक बातमी समोर आली असून एका चिमुकल्याला हातपाय बांधून अमानुष मारहाण करण्यात आली आहे. या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून याप्रकरणी चिमुकल्याच्या आईच्या दुसऱ्या पतीविरोधात जालन्यातील जाफराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पैश्यासाठी चिमुकल्याला हातपाय बांधून अमानुष मारहाण केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली असून या घटनेचा व्हिडिओ (Video viral) सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर जालना पोलिसांकडून चिमुकल्याची सुखरूप सुटका करण्यात आली.
या प्रकरणी चिमुकल्याच्या आईच्या दुसऱ्या पतीविरोधात जालन्यातील जाफराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, आरोपी शेख अनिस शेख वजीर याला शिर्डी येथून ताब्यात घेण्यात आले असून पुढील चौकशी सुरू आहे. तपासादरम्यान संबंधित मुलगा आरोपीच्या ताब्यात असल्याची माहिती समोर आली. त्यानंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करत मुलाची सुखरूप सुटका केली. सध्या या मुलाला त्याच्या कुटुंबाकडे देण्यात आले असून तो सुरक्षित असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
प्राथमिक माहितीनुसार मारहाणीची घटना शिर्डी परिसरात घडल्याचे समोर आल्याने हा गुन्हा पुढील तपासासाठी शिर्डी येथे वर्ग करण्यात येणार असल्याचे जालना जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक तेघबीर सिंह संधू यांनी सांगितले. या घटनेमुळे बालकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.