Jalna Accident: जालना-बीड महामार्गावर मोठा अपघात! दोन एसटी बसची भीषण धडक; विद्यार्थ्यांसह 30 ते 40 जण जखमी

जालना-बीड महामार्गावरील शहापूरजवळ गल्हाटी नदीच्या पुलावर एसटीच्या दोन बसची समोरासमोर धडक झाली.

Jalna Accident: जालना-बीड महामार्गावर मोठा अपघात! दोन एसटी बसची भीषण धडक; विद्यार्थ्यांसह 30 ते 40 जण जखमी

जालना-बीड महामार्गावर शनिवारी सकाळी झालेल्या भीषण अपघाताने परिसरात खळबळ उडाली. अंबड तालुक्यातील शहापूर गावाजवळ गल्हाटी नदीच्या पुलावर महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) दोन बस समोरासमोर धडकल्याने ३० ते ४० जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. जखमींमध्ये शाळकरी विद्यार्थ्यांसह प्रवाशांचा आणि दोन्ही बस चालकांचा समावेश असल्याचे सांगितले जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अपघात सकाळी सुमारे ९ वाजण्याच्या सुमारास घडला. भाबेरी येथून विद्यार्थ्यांना घेऊन अंबडकडे येणारी अंबड आगाराची एक एसटी बस आणि अंबडहून बीडकडे निघालेली दुसरी एसटी बस शहापूरजवळील गल्हाटी नदीच्या पुलावर समोरासमोर आल्या. काही क्षणांतच दोन्ही वाहनांची जोरदार धडक झाली. धडकेचा आवाज इतका मोठा होता की परिसरातील नागरिक तातडीने घटनास्थळी धावले.

हेही वाचा:Siya Goyal Viral Photo Controversy : 'ते अश्लील हावभाव नव्हतेच', सियाच्या वडिलांचा मोठा दावा; म्हणाले गाडीच्या दरवाज्यात..

अपघाताची तीव्रता इतकी होती की दोन्ही बसच्या पुढील भागाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. बसमधील अनेक प्रवासी जागेवरच जखमी झाले. विशेष म्हणजे, एका बसमध्ये मोठ्या संख्येने शाळकरी विद्यार्थी प्रवास करत असल्याने या घटनेने पालकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तत्परता दाखवत बचावकार्य सुरू केले. बसमध्ये अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्यात आले आणि जखमींना तातडीने अंबड येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. गंभीर जखमींवर आवश्यक वैद्यकीय उपचार सुरू असल्याची माहिती मिळत आहे.

या अपघातात दोन्ही बस चालकांनाही दुखापत झाली असून त्यांच्यावरही उपचार सुरू आहेत. जखमींची अचूक संख्या आणि त्यांची प्रकृती याबाबत प्रशासनाकडून अधिकृत माहिती येण्याची प्रतीक्षा आहे.

हेही वाचा:Crime News: आईशेजारी झोपलेल्या निष्पाप मुलाचं नाक अन् गुप्तांग कापलं; प्रेमसंबंध आणि जुन्या वादातून चिमुरड्याचा क्रूर छळ

घटनेची माहिती मिळताच पोलिस आणि संबंधित प्रशासनाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. अपघाताचे नेमके कारण काय होते, याचा तपास सुरू करण्यात आला आहे. प्राथमिक पाहणीत दोन्ही बसची समोरासमोर धडक झाल्याचे स्पष्ट झाले असले तरी वेग, रस्त्याची परिस्थिती किंवा अन्य कोणते कारण अपघातास कारणीभूत ठरले का, याची चौकशी केली जात आहे.

या अपघातामुळे जालना-बीड महामार्गावरील वाहतुकीवर काही काळ परिणाम झाला होता. पोलिसांनी आणि स्थानिक प्रशासनाने अपघातग्रस्त बस बाजूला करून वाहतूक सुरळीत करण्याचे काम केले. दरम्यान, या घटनेमुळे एसटी प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, अपघाताची सखोल चौकशी करून आवश्यक उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number