जळगाव : जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यातील गारखेडा गावात जमिनीच्या वादातून सख्ख्या पुतण्याने काकाची हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. हत्येनंतर पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह नाल्याच्या कडेला टाकून अपघाताचा बनाव रचण्यात आला होता. मात्र रावेर पोलिसांनी केलेल्या सखोल तपासातून संपूर्ण प्रकाराचा पर्दाफाश झाला असून आरोपी पुतण्याला अटक करण्यात आली आहे.
मृत व्यक्तीचे नाव रामा थावरू बारेला (वय 46) असे असून, त्यांचा मृतदेह काही दिवसांपूर्वी गारखेडा परिसरातील नाल्याजवळ संशयास्पद अवस्थेत आढळून आला होता. सुरुवातीला ही घटना अपघात असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला. मात्र घटनास्थळी पोलिसांनी केलेल्या पाहणीत मृताच्या डोक्यावर गंभीर स्वरूपाच्या जखमा असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे या प्रकरणात घातपाताची शक्यता गृहीत धरून तपास सुरू करण्यात आला.
तपासादरम्यान पोलिसांनी मृताच्या कुटुंबीयांसह गावातील नागरिकांची चौकशी केली. त्यावेळी मृत रामा बारेला आणि त्यांचा पुतण्या अनिल जखा बारेला (वय 29) यांच्यात जमिनीच्या मालकीवरून दीर्घकाळ वाद सुरू असल्याची माहिती समोर आली. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी अनिलची कसून चौकशी केली.
चौकशीत आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 21 जुलै रोजी जमिनीच्या वादातून दोघांमध्ये जोरदार वाद झाला. या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले आणि संतापाच्या भरात अनिलने लाकडी काठीने काकाच्या डोक्यावर वार केला. गंभीर दुखापतीमुळे रामा बारेला यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
घटना घडल्यानंतर संशय येऊ नये म्हणून आरोपीने मृतदेह सुमारे 20 ते 25 मीटर अंतरापर्यंत ओढत नेला आणि नाल्याच्या कडेला टाकला. हा अपघात असल्याचा आभास निर्माण करण्याचा त्याचा प्रयत्न होता. मात्र पोलिसांनी घटनास्थळावरील पुरावे, जखमांचे स्वरूप आणि अन्य तांत्रिक माहितीच्या आधारे तपासाची दिशा बदलत सत्य समोर आणले.
पोलिसांनी आरोपी अनिल बारेला याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने हत्येची कबुली दिली. त्यानंतर त्याच्याविरुद्ध रावेर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे.
या घटनेमुळे गारखेडा परिसरात मोठी खळबळ उडाली असून, केवळ जमिनीच्या वादातून नात्यांचे बंध तुटून एवढ्या टोकाचे पाऊल उचलल्याने नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे. या प्रकरणाचा पुढील तपास रावेर पोलीस करत आहेत.