आखाती देशांतील संघर्षामुळे देशामध्ये मोठ्या प्रमाणावर इंधन तुटवडा जाणवत आहे, याचा अनेक क्षेत्रांना मोठा फटका बसला आहे. आता या इंधन तुटवड्याची झळ शेती क्षेत्रालाही बसू लागली असून, डिझेल अभावी ग्रामीण भागात शेतीची कामे रखडल्याचे चित्र आहे. अशातच दुपारपासून डिझेल मिळण्यासाठी जळगावच्या धरणगाव येथे ताटकळत उभ्या असलेल्या सुमारे 250 शेतकऱ्यांची गैरसोय आणि भूक लक्षात घेऊन, पवार पेट्रोलियमचे संचालक चंदन दिलीप पाटील यांनी अत्यंत संवेदनशील निर्णय घेतला.
त्यांनी तात्काळ या सर्व शेतकऱ्यांसाठी पेट्रोल पंपावरच रात्रीच्या भोजनाची (पंगतीची) व्यवस्था करून देत माणुसकीचा प्रत्यय दिला आहे. रात्री उशिरापर्यंत डिझेलची वाट पाहत थांबलेल्या बळीराजाला उपाशी राहावे लागू नये, म्हणून चंदन पाटील यांनी पंपाच्या आवारातच पंगती बसवून सर्व शेतकऱ्यांना आग्रहाने जेवू घातले.
दुपारी दोन वाजल्यापासून डिझेलसाठी ताटकळणाऱ्या शेतकऱ्यांना या संकटसमयी हक्काचे जेवण मिळाल्याने त्यांनी संचालक चंदन पाटील यांच्या या सामाजिक जाणिवेचे आणि औदार्याचे मनापासून आभार मानले. ऐन गरजेच्या वेळी डिझेल उपलब्ध करून देण्यासोबतच, शेतकऱ्यांच्या भुकेची काळजी घेणाऱ्या पवार पेट्रोलियमच्या या उपक्रमाचे धरणगाव तालुक्यात कौतुक होत आहे. टँकर दाखल होताच सर्व शेतकऱ्यांना डिझेलचे रीतसर वाटप करण्यात येणार असल्याचे व्यवस्थापनाकडून सांगण्यात आले.