जळगाव: जळगाव जिल्ह्यातील धरणगाव तालुक्यात भेसळयुक्त दूध तयार करण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून या प्रकरणामुळे संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. पोमोलीन तेल, रासायनिक मिश्रण आणि मिक्सरच्या सहाय्याने कृत्रिम दूध तयार करून ते बाजारात विकले जात असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासनाच्या (एफडीए) कारवाईत समोर आली आहे. या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी सोमनाथ माळी हा कारवाईदरम्यान अधिकाऱ्यांना चकवा देत पसार झाला असून पोलिसांकडून त्याचा शोध सुरू आहे.
एफडीएच्या पथकाला मिळालेल्या गुप्त माहितीनंतर धरणगाव परिसरात छापा टाकण्यात आला. यावेळी एका ठिकाणी मोठ्या प्रमाणात भेसळयुक्त दूध तयार केले जात असल्याचे उघड झाले. प्राथमिक तपासात पोमोलीन तेल दुधात मिसळून विशेष मशीन आणि मिक्सरच्या सहाय्याने ते मिश्रण तयार केले जात असल्याचे निदर्शनास आले. हे कृत्रिम दूध नंतर विक्रीसाठी बाजारात पाठवले जात असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
कारवाईदरम्यान एफडीए अधिकाऱ्यांनी घटनास्थळी सुमारे दोन हजार लिटरपेक्षा अधिक भेसळयुक्त दूध जप्त करून नष्ट केले. पंचनामा सुरू असताना मुख्य आरोपी सोमनाथ माळी याने लघुशंकेचे कारण सांगत घटनास्थळावरून पळ काढल्याची माहिती समोर आली आहे. अचानक अंधाराचा फायदा घेत तो पसार झाला आणि अधिकाऱ्यांच्या हातातून निसटला.
या प्रकरणात आणखी एक धक्कादायक बाब समोर आली आहे. संशयित आरोपी सोमनाथ माळी याच्याविरोधात यापूर्वीही दूध भेसळीसंदर्भात गुन्हा दाखल झाल्याची माहिती पोलिस तपासात उघड झाली आहे. त्यामुळे आता पोलिसांकडून त्याच्या आधीच्या गुन्ह्यातील जामीन रद्द करण्यासाठी न्यायालयात पाठपुरावा करण्यात येणार आहे.
डॉक्टरांनी या प्रकाराबाबत गंभीर इशारा दिला आहे. पोमोलीन तेल आणि रासायनिक घटक मिसळून तयार केलेले दूध मानवी आरोग्यासाठी अत्यंत धोकादायक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. अशा प्रकारचे भेसळयुक्त दूध नियमित सेवन केल्यास किडनी, लिव्हर आणि हृदयावर गंभीर परिणाम होऊ शकतात. दीर्घकाळ अशा दुधाचा वापर झाल्यास कॅन्सरसारख्या गंभीर आजारांचा धोका वाढण्याची शक्यता असल्याचेही डॉक्टरांनी सांगितले.
या घटनेनंतर नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून अन्न सुरक्षेबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत. पोलिसांनी अन्न सुरक्षा आणि मानके अधिनियम 2006 तसेच भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. आरोपीच्या शोधासाठी विशेष पथक रवाना करण्यात आले असून या रॅकेटमध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचाही तपास सुरू आहे.
.