Delhi Terror Plot: देशाची राजधानी दिल्ली पुन्हा एकदा दहशवाद्यांच्या निशाण्यावर असल्याचे समोर आले आहे. मुंबई पोलीस आणि दिल्ली पोलिसांच्या 'स्पेशल सेल'ने एका संयुक्त मोहिमेत 'जैश-ए-मोहम्मद' या दहशतवादी संघटनेशी संबंधित दोन संशयितांना अटक केली आहे. मोसाब अहमद (उर्फ कलाम) आणि मोहम्मद हमद कालरा अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. हे दोघेही दिल्लीत एका खेळण्यातील कारचा वापर करून आयईडी (IED) स्फोट घडवण्याचा कट रचत होते, मात्र त्यांचा हा घातक मनसुबा पोलिसांनी वेळीच उधळून लावला आहे.
संयुक्त मोहिमेत दोन संशयित ताब्यात; कुर्ला आणि कडवलीतून अटक
महाराष्ट्र एटीएस (ATS) आणि दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने गुप्त माहितीच्या आधारे मुंबईतील कुर्ला आणि कडवली परिसरात ही धाडसी कारवाई केली. मोसाब आणि हमद या दोघांनाही ताब्यात घेण्यात आले असून पुढील कायदेशीर कार्यवाहीसाठी त्यांना तातडीने दिल्लीला रवाना करण्यात आले आहे. दिल्लीत पोहोचल्यानंतर त्यांना न्यायालयासमोर हजर करून पोलीस कोठडीची मागणी केली जाईल, जेणेकरून या कटामागील मास्टरमाइंड आणि इतर साथीदारांची माहिती समोर येऊ शकेल.
ऑनलाइन 'ब्रेनवॉशिंग' आणि 'जैश'शी संबंध
तपास यंत्रणांच्या प्राथमिक माहितीनुसार, मोसाब आणि हमद यांचे ऑनलाइन माध्यमांद्वारे कट्टरपंथी विचारसरणीने 'ब्रेनवॉशिंग' करण्यात आले होते. हे दोघेही जैश-ए-मोहम्मदच्या सीमापार बसलेल्या म्होरक्यांच्या इशाऱ्यावर भारतात घातपाती कारवाया करण्यासाठी सक्रिय होते. पोलिसांनी त्यांच्याकडून काही संवेदनशील साहित्य आणि कागदपत्रे जप्त केली आहेत. या साहित्यावरून ते दिल्लीत मोठ्या प्रमाणावर जीवितहानी घडवण्याच्या तयारीत असल्याचे स्पष्ट होत आहे.
लाल किल्ला मेट्रो स्टेशन स्फोटाच्या आठवणी ताज्या
दिल्लीत अवघ्या 5 महिन्यांपूर्वी झालेल्या भीषण स्फोटाच्या पार्श्वभूमीवर ही अटक अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. 10 नोव्हेंबर 2025 रोजी 'लाल किल्ला मेट्रो स्टेशन'च्या गेट क्रमांक 1 जवळ एका कारमध्ये 'अमोनियम नायट्रेट'चा वापर करून स्फोट घडवण्यात आला होता. त्या दुर्घटनेत 15 निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाला होता, तर 20 हून अधिक जण जखमी झाले होते. त्या घटनेची पुनरावृत्ती टाळण्यात पोलिसांना यावेळेस यश आले असून दिल्लीकरांनी मोठा सुटकेचा निश्वास टाकला आहे.